सावंतवाडी वार्ताहर: कोकणातील होळी सण काल २मार्च पासून सुरू झाला. सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त गणशेळवाडी येथील नवसाला पावणारे देवस्थान म्हणून श्री देव धावगिरा देवस्थान येथे काल सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होळी सण जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसाम्राज्य मंडळाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी होळी उत्सवाचे नियोजन केले होते. विशेष म्हणजे निसर्ग व पर्यावरण बचाव साठी या होळी सणात असा संकल्प करण्यात आला कि भाविकांनी आंब्याचे झाड सध्या लुप्त होत चालले आहे. त्यासाठी प्रत्येक भाविक आंब्याच्या पायऱ्या जतन करतील आणि दरवर्षी दोन आंब्याची झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. आणि अशा पद्धतीने यंदाची होळी आगळ्यावेगळ्या पद्धतीने आंब्याची झाडे लावण्याचा संकल्प करत नवा पायांडा या देवस्थानच्या ठिकाणी भाविकांनी घातला. मंडळ पर्यावरण व निसर्ग जतन साठी हा उपक्रम घेणार आहे असे स्पष्ट करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती. आंब्याचे झाड होळी होळी म्हणून पूजन करण्यात आले. वाजत गाजत मिरवणुकीने होळी देवस्थान ठिकाणी नेण्यात आली. त्यानंतर श्री देव धावगिरे देवस्थानच्या जय घोषात होळी घालण्यात आली. यावेळी सायंकाळी पाच वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सामाजिक कार्यकर्ते सुरेश उर्फ आबा सावंत यांच्या मालकीचे आंब्याचे झाड यावेळी कार्यकर्त्यांनी व भाविकांनी निवडून त्याचे पूजन केले. यावेळी विधिवत श्री देव धावगिरा येथे होळी विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री देवाचे दर्शन घेत भाविकांनी आपले नवस फेडले.
यावेळी सध्या कोकणात आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा फणस ही वृक्ष आता जतन करणे आवश्यक आहे. पूर्वीप्रमाणे ही आंब्याची स्थानिक वृक्ष नामशेष होत होत आली आहेत. आंब्याचे झाड मिळणेही दुरापास्त झाले आहे. भावनिक व अध्यात्मिकाच्या माध्यमातून दरवर्षी आंब्याचे झाड होळी म्हणून पूजन केले जाते. मग आता यापुढे आपण होळी सणात या देवस्थानच्या ठिकाणी असा संकल्प करूया की दरवर्षी भाविक उन्हाळी हंगामात आंबे आपापल्या घरी आणतात ते आंबे खाल्ल्यावर त्यांच्या परंब्या आपण जतन करूया आणि त्यातून स्थानिक आंब्याची झाडे लावूया.प्रत्येकाने दोन तरी आंब्याची झाडे लावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसे गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी हे धावगीरा देवस्थान नवसाला पावणारे असे आहे. दरवर्षी नवस फेडण्यासाठी भाविक होळी सणाच्या दिवशी येथे दर्शनासाठी रांगा लावतात यावर्षी अलोट गर्दी झाली होती. या परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. सर्वत्र देवस्थानाचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर या गावातील मानाची गावची होळी उत्साहात घालण्यात आली. नऊ दिवस शिमगोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन गाव चव्हाटा येथे करण्यात आले आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
फोटो: सावंतवाडी कलंबिस्त गणशेळवाडी येथील श्री धावगिरा देवस्थान ठिकाणी होळी सण साठी भाविकांची अलोट गर्दी
छाया: संतोष सावंत
