स्टोरी

सावंतवाडी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुतळ्यासमोरील आंब्याचे झाड बेकायदेशीरपणे तोडल्याचा ‘वी फॉर यू’ संस्थेचा आरोप.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: शहरातील मोती तलाव काठावरील पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुतळ्यासमोरील आंब्याचे झाड बेकायदेशीरपणे तोडल्याचा आरोप करत याप्रकरणी ‘वी फॉर यू‘ या सेवाभावी संस्थेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या वृक्षतोडीची गंभीर दखल घेऊन संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संस्थेच्यावतीने सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ‘वी फॉर यू’ संस्थेने दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ अन्वये नगरपरिषद हद्दीत झाडे तोडण्यासाठी कडक नियमावली आहे. विनापरवाना झाड तोडणे हा कायदेशीर गुन्हा आहे. असे असतानाही येथील आंब्याचे झाड कोणताही विचार न करता आणि कायद्याचे उल्लंघन करून तोडण्यात आले आहे. या संदर्भात माहितीच्या अधिकारात आवश्यक ती कागदपत्रे प्राप्त झाली असून ती निवेदनासोबत जोडण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच केवळ वृक्षतोडच नव्हे, तर शहरातील झाडांच्या दुरवस्थेकडेही संस्थेने लक्ष वेधले आहे. शहरात अनेक ठिकाणी झाडांवर खिळे ठोकून जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. यामुळे झाडांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होत आहे. हे खिळे आणि जाहिराती तातडीने काढून झाडांना मुक्त करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देताना ‘वी फॉर यू’ संस्थेच्या सामाजिक कार्याचीही आठवण करून देण्यात आली आहे. कोरोना काळात आरटीपीसीआर रिपोर्ट आयसीएमआरच्या वेबसाईटवर विनाचूक भरण्यासाठी आणि रुग्णांना रिपोर्ट मोबाईलवर मिळण्यासाठी या संस्थेने विनामूल्य प्रणाली विकसित करून प्रशासनाला मोठी मदत केली होती. या निवेदनावर ‘वी फॉर यू’ संस्थेचे अध्यक्ष अॅड. संकेत नेवगी, सचिव अॅड. स्वप्नील कोलगावकर आणि सह-सचिव अमेय महाजन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता या तक्रारीनंतर सावंतवाडी नगरपरिषद वृक्षतोड करणाऱ्यांवर काय कारवाई करणार ? याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.


Spread the love

Related posts

गोव्यातील ‘वैश्विक हिन्दू राष्ट्र महोत्सवा’त मंदिर विश्वस्तांचा निर्धार!

news

प्रशासनाला कधी जाग येणार? सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांचा प्रश्न….

news

मासुरेत पावनाई देवी महिला दूध उत्पादक कृषी सहकारी संस्थेतर्फे सभासदांना गृहपयोगी वस्तू भेट.

news

Leave a Comment