कुडाळ: पोलीस प्रशासनाला निवेदन देताना तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट, शहर निरिक्षक सुशील चिंदरकर, अमित राणे, गुरु गडकर, धिरेंद्र चव्हाण व संतोष अडूरकर व ईतरकुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा हा आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सुविधा आणि एआयच्या दिशेने वाटचाल करणारा देशातील अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र अशा जिल्ह्यातच सुरक्षा यंत्रणेचा कणा मानली जाणारी सीसीटीव्ही व्यवस्था बंद पडणे हे दुर्दैव आहे. महिला मुंबईतून लाखो रूपयांचे दागिने सुरक्षित घेऊन येतात मात्र कुडाळ बसस्थानकात लाखोंचे दागिने चोरीला जातात. कोरोना काळात रस्त्यावर फिरणार्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी अलर्ट असणारी सीसीटीव्ही यंत्रणा आता चोरांवर लक्ष ठेवण्यात कुचकामी का ठरली आहे अशा अनेक प्रश्नांचा भडिमार उबाठा शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी यांनी कुडाळ पोलीस स्टेशनची भेट घेत पोलीस प्रशासनावर केला.

कुडाळ शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा, वाढते चोरीचे प्रकार, वाहतूक कोंडी, अमली पदार्थांचे प्रकार आणि सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न यावरून उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात भेट घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी नगरपंचायत, एसटी प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्त बैठक घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात आली.यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा सध्या बंद अवस्थेत आहे. त्यामुळे चोरट्यांना शहरातील सुरक्षा व्यवस्था कमकुवत झाल्याची माहिती मिळाली असून, त्याचाच फायदा घेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करण्यात आला.सिंधुदुर्ग जिल्हा हा आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सुविधा आणि एआयच्या दिशेने वाटचाल करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र अशा जिल्ह्यातच सुरक्षा यंत्रणेचा कणा मानली जाणारी सीसीटीव्ही व्यवस्था बंद पडणे हे दुर्दैवी असल्याची टीका करण्यात आली.तसेच कुडाळ एसटी बसस्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणांहून महिला प्रवासी लाखो रुपयांचे दागिने घेऊन सुरक्षितपणे प्रवास करत कुडाळमध्ये येतात , मात्र कुडाळ बसस्थानकात चोरीच्या घटना घडून हा लाखोंचा ऐवज लंपास होतो, याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात आला. बसस्थानकातील घड्याळ देखील अनेकदा नादुरुस्त होत असल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला.शहरात गांजा विक्री व सेवनासारखे गंभीर प्रकार अधूनमधून समोर येत असताना, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही नसणे चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. अशा स्थितीत “चोरांचा सुळसुळाट रोखणार कोण?” असा गंभीर प्रश्न उपस्थित करत प्रशासनावर टीका करण्यात आली.पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळाची आठवण करून देत सांगितले की, त्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सार्वजनिक स्पीकर यंत्रणा पूर्णपणे कार्यरत होती. रस्त्यावर फिरणारे नागरिकही नियंत्रण कक्षातून सहज दिसत होते. मात्र आता सीसीटीव्ही बंद असल्याने गुन्हेगारही दिसत नाहीत. “एखादा अनुचित प्रकार घडण्याची वाट पाहिली जात आहे का?” असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला.तसेच शहरातील पेट्रोल पंपाजवळील सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्त्यावर लागत असल्याने वाहतूक कोंडी, वाद आणि अपघाताचा धोका वाढत आहे. यावर वाहतूक विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली.पालकमंत्री, जिल्हा नियोजन समिती किंवा संबंधित विभागामार्फत निधी उपलब्ध करून शहरातील बंद सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.दरम्यान, पोलीस प्रशासनाने शहरातील सीसीटीव्ही आणि इतर सुरक्षाविषयक प्रश्नांबाबतचे प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवले असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. आता प्रशासन कोणती ठोस कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी निवेदन कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट, शहर निरिक्षक सुशील चिंदरकर, अमित राणे, गुरु गडकर, धिरेंद्र चव्हाण व संतोष अडूरकर उपस्थित होते.
