सावंतवाडी (सिंधुदुर्ग): सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. सावंतवाडी तालुक्यातील रिल्स बनवणाऱ्या महिला नमिता सावंत हिने महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) च्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून अपंग व्यक्ती सातोशे याला मारहाण करत मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. नमिता सावंत यांनी एका अपंग व्यक्तीला सोशल मीडियावरील कमेंटच्या रागाने ‘मनसे स्टाइल‘ ने प्रत्युत्तर दिल्याचा व्हिडीओ तिने स्वतः प्रसारित केला आहे. व्हायरल व्हिडिओनुसार, नमिता सावंत यांच्या सोशल मीडिया पोस्टवर अपंग व्यक्तीने अश्लील कमेंट केल्याने रागाच्या भरात त्यांनी थेट त्याच्यावर हल्ला चढवला असल्याची प्रथम माहिती मिळत आहे. अपंग व्यक्तीला मारहाण केल्यानंतर तिने स्वतः जो व्हिडीओ प्रसारित केल्यामुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. व्हिडिओमध्ये नमिता सावंत हिने मारहाण झालेल्या व्यक्तीने विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्वतः सांगितले आहे. एका अपंग व्यक्तीने विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरीपण त्याबाबत कोणत्याही पोलीस स्टेशनला योग्य ती नोंद नाही. तसेच त्याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदारपणे व्हायरल होत आहे. त्यामुळे नमिता सावंत आणि मनसे पदाधिकारी यांनी कायदा हातात घेतल्यामुळे त्यांच्यावर योग्य तो गुन्हा दाखल होणार कि नाही? हा मोठा प्रश्न आहे. हा व्हिडिओ पाहून नागरिक हैराण झाले आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, या अपंग व्यक्तीने घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. हे धक्कादायक आहे.
सातोशे या व्यक्तीने नमिता सावंत या महिलेच्या व्हिडिओवर अश्लील कमेंट करणं हि बाब योग्य नाही. मात्र त्यासाठी कायदा, पोलीस, न्यायालय, सैबरक्राईम यांच्याकडे योग्य ती तक्रार केल्यावर नमिता सावंत हिला योग्य तो न्याय मिळाला असताच. मात्र नमिता सावंत या महिलेने तसं न करता कायदा हातात घेतला असून प्रसिद्धीसाठी आणि फॉलोवर्ससाठी किंवा स्वतःच्या मोठेपणासाठी रिल्स बनवली काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नमिता सावंत सोबत एका गाडीमध्ये हा व्हिडीओ बनावताना मनसे जिल्हा पदाधिकारी ऍड. अनिल केसरकर आहेत. अनिल केसरकर स्वतः एक वकील आहेत म्हणजे त्यांना कायद्याची माहिती आहे. मात्र एक कायदेतज्ञ व्यक्तीच अशा उपस्थित राहतात किंवा नमिता सावंत हिला साथ देतात हे नवलंच आहे.
कोण दिला अधिकार?
प्रश्न उपस्थित होत आहे की, एखादा व्यक्ती चुकला तर त्यासाठी कायदा आहे. तरीपण त्या अपंग व्यक्तीला मारहाण होते. कोणत्या अधिकाराने एका अपंग व्यक्तीला अशा रीतीने मारहाण करण्यात आली? नमिता सावंत यांनी प्रथम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याऐवजी थेट हिंसक मार्गाचा अवलंब केल्याचे दिसते. कायद्याच्या राजवटीत ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. सध्या या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आता पोलीस प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपंग व्यक्तींच्या सुरक्षिततेला आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या अशा घटनांवर कठोर कारवाई न झाल्यास, समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल. हे नाकारता येत नाही. तसेच अपंग सातोशे या व्यक्तीने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुन्हा सोशलमीडियावर होत असलेल्या बदनामीमुळे आत्महत्या केली तर याला जबाबदार कोण? हा मोठा प्रश्न आहे.
