पनवेल|महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागाची जबाबदारी स्वीकारलेल्या नवनिर्वाचित उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्याकडून पनवेलकर आशेने पाहत आहेत. शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी त्यांचा लवकरच पनवेल दौरा होणार असल्याची शक्यता आहे.पनवेल, जेएनपीटी मार्ग आणि आगामी विमानतळ क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थापन हे डॉ. खाडे यांच्यासमोरचे प्रमुख आव्हान आहे. अरुंद रस्ते, अनधिकृत पार्किंग, अवैध रिक्षा-टॅक्सी स्टँड्स आणि सिग्नल यंत्रणेच्या समस्या सोडवून शहरातील चाकरमान्यांना रोजच्या प्रवासात दिलासा देण्याची मोठी जबाबदारी आता त्यांच्याकडे आहे.
नागरिकांच्या मुख्य अपेक्षा :
- कळंबोली सर्कल, खांदा कॉलनी, बस स्थानक परिसर आणि पालस्पे फाटा यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी वाहतूक पोलिस आणि वॉर्डन्सची संख्या वाढवणे
- स्मार्ट सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे
- अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई
- उड्डाणपुल व रस्त्यांच्या कामांना गती देणे
हेल्मेट सक्तीची मोहीम शिस्तीसाठी महत्त्वाची असली तरी, पनवेलकरांची प्रमुख मागणी आहे की कोंडीमुक्त पनवेलला प्राधान्य दिले जावे. स्थानिक स्वराज्य संस्था, सिडको आणि वाहतूक विभाग यांच्यातील समन्वयातून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची तयारी डॉ. खाडे यांनी दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पनवेलकर आता डॉ. राहुल खाडे यांच्या क्षेत्रीय दौऱ्याची आणि ठोस कार्यवाहीची आतुरतेने वाट पाहत आहेत. सकारात्मक आणि प्रभावी पावलांनी पनवेलची वाहतूक व्यवस्था सुधारेल, याची खात्री नागरिकांना आहे.
