स्टोरी

लहान मुलांची वासतिगृहं आणि वृद्धाश्रम!

Spread the love

आपण सोशल मीडियावर अनेक वेळा व्हिडिओ बघतो किंवा अनेक वेळा काही पोस्ट वाचतो की आई-वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवू नका. आई-वडिलांना चांगल्याप्रकारे बाळगा. आई वडील, वृद्ध व्यक्ती आणि वृद्धाश्रम याबद्दल बऱ्याच भावनिक पोस्ट आपण वाचत असतो. तसेच भावनिक फोटो आणि व्हिडीओ बघून आपण भावनिक होत असतो. एक पण एक म्हण आहे की ‘नाण्याच्या दोन बाजू असतात‘. आपण असा एखादा व्हिडिओ बघून किंवा एखादी भावनिक पोस्ट वाचून भावनिक होतो. आपण फक्त एखादी पोस्ट वाचून एखादा व्हिडिओ बघून भावनिक होण्यापेक्षा त्यामागे काय कारण असेल हे पण शोधणे खूप महत्त्वाचं असतं. कित्येकवेळा आपण असे म्हणतो की, वृद्धाश्रम असलेच नाही पाहिजेत, जेणेकरून म्हाताऱ्या आई-वडिलांना मुलं वृद्धाश्रमात ठेवणार नाहीत. पण आज जर एकंदरीत आपण बघितलं तर वृद्धाश्रमामध्ये आई-वडिलांना ठेवण्याचे कारण म्हणजे मुलांना त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसणं हे महत्त्वाचा मुद्दा आहे.

आजच्या एकविसाव्या शतकात मुलांना आई-वडिलांकडे लक्ष द्यायचे की पैसे कमवायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भरपूर पैसे कमवावे, प्रतिष्ठा कमवावी आणि स्वतःचे जीवन बिनधास्त जगता याव यासाठी काही व्यक्ती आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात असे चित्र दिसतं. आणि याबाबतच्या अनेक व्हिडिओ आणि फोटो आपण वाचतो आणि भावनिकही होतो.

आता विचार करणं गरजेचे आहे की नाण्याच्या दोन बाजू असतात. आपण असं समजूया की वृद्धाश्रम किंवा आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवू नये ही नाण्याची एक बाजू झाली. नाण्याची दुसरी बाजू बघता आज लहान मुलांना अनेक वेळा त्यांच्यावर चांगले संस्कार घडावे, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यांचे भविष्य चांगले व्हावे असे अनेक विषय सांगून अनेक आई वडील आपल्या मुलांना स्वतःपासून दूर अर्थातच वासतिगृहामध्ये (हॉस्टेलमध्ये) ठेवतात. खरंतर मुलांना आता होस्टेलमध्ये ठेवणं ही एक फॅशनच झाली आहे. मुलांना चांगलं वळण यावं, चांगले गुण लागावे, मुलांनी चांगल्या पद्धतीने शिकावं, मुलांनी अभ्यास करावा यासाठी कित्येक लोक आज मुलांना वासतिगृहामध्ये (हॉस्टेलमध्ये) शिकण्यासाठी ठेवतात. आज आपण अनेक हॉस्टेलमध्ये बघितलं तर तिसरी, चौथीची मुलं जी अगदी लहानच आहेत ती सुद्धा आपल्याला हॉस्टेलमध्ये शिकताना दिसतील. याच्यामागे ही अनेक कारणे असतात. काही पालक असे सांगतात की, आपल्याला मुलांना चांगलं वळण देण्यासाठी, चांगलं शिक्षण शिकवण्यासाठी, किंवा चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही. आपण कामधंद्यामध्ये असतो. सध्या मुलांना बाळगण्यासाठी, मुलांना शिकवण्यासाठी त्यांना सगळं व्यवस्थित देण्यासाठी, त्यांचे करिअर घडवण्यासाठी भरपूर पैसा लागतो आणि आम्हाला पैसा कमावण्यासाठी वेळ द्यावा लागतो. आम्हाला नोकरीसाठी वेळ द्यावा लागतो आणि त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होतो. त्यामुळे साहजिकच आम्हाला मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवावे लागते, जेणेकरून मुलांचे शिक्षण चांगलं झालं पाहिजे.

एकंदरीत विचार केला तर आई-वडिलांनी पैसे कमवण्यासाठी काही मुलांनी वासतिगृहात ठेवलं आणि काही मुलांनी पैसा कमावण्यासाठी, आपल्या व्यवसाय धंद्यांवर लक्ष देण्यासाठी, नोकरी करण्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं. तसं विचार केला तर दोन्ही प्रकार हे एकच आहेत. पैसे कमवण्यासाठी आई-वडिलांनी मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवणं आणि पैसे कमवण्यासाठी मुलांनी आई- वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणं. यात मला तरी फारसा फरक दिसत नाहीय. कारण दोन्ही ठिकाणी विषय आहे तो पैसे कमवण्याचाच.

आता विचार करण्यासारखं आहे की, आपणच लहानपणापासून मुलांना दाखवून देत आहोत की मला तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही आहे. मला तुमच्यासाठी भरपूर पैसे कमवायचे आहेत. त्यासाठी मला भरपूर काम करावं लागतं. मला दिवसभर नोकरी करावी लागते. तुमचे शिक्षण, तुमचं खाणं-पिणं आणि तुमच्यासाठी कपडे यासाठी मला दिवसभर राब राब राबव लागतं आणि त्यासाठी तुमचं शिक्षण, तुमचं जेवण, तुमचं करिअर योग्य पद्धतीने व्हावं म्हणून आम्हाला तुम्हाला अर्थात मुलांना होस्टेलमध्ये ठेवावं लागतं. त्यामुळे मुलं हॉस्टेलमध्ये राहतात. मुलं मोठी होतात. योग्य प्रकारे आपलं नोकरी व्यवसाय करतात.

आता पुढे जाऊन मुलंही जेव्हा मोठी होतात, मुलांची जेव्हा लग्न होतात, तेव्हाही मुलं सहाजिकच आई-वडिलांना सांगतात की आता आम्हाला पैसे कमवायचे आहेत, आम्हाला तुम्हाला योग्य पद्धतीने सांभाळायचे आहे, तुम्हाला औषध वगैरे योग्य प्रकारे देण्यासाठी आमच्याकडे वेळ नसतो. कारण आम्हाला पैसे कमवायचे असतात. आम्हाला काम करायचं असतं. त्यामुळे आम्हाला आता तुम्हाला रुद्धाश्रमात ठेवल्याशिवाय काही पर्याय नाहीय. असं सांगून मुलं आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. मग आता नाण्याच्या दोन्ही बाजू बघितल्या तर नेमकं चुकतंय कुणाचं? तर आज मला या लेखातून एवढंच सांगायचं आहे की खरंतर आजचे काही पालकच चुकत आहेत. जे मुलांना होस्टेलमध्ये ठेवत आहेत. अर्थात आत्तापासूनच आपल्या मुलांना ते दूर ठेवत आहेत. आणि त्याला कारण देत आहेत की मला पैसे कमवायचे आहेत, तुमच्यासाठी मला वेळ देता येत नाही. तुमच्यासाठी मला पैसे कमवायचे आहेत. नोकरी करायची आहे. आणि त्यामुळे साहजिकच तुमच्या शिक्षणाकडे, तुमच्या करिअरकडे, मला वेळ देता येत नाही. तुमचे योग्य शिक्षण व्हावं, योग्य करिअर व्हावं म्हणून मी तुम्हाला हॉस्टेलमध्ये ठेवत आहे. विचार केला तर काही पालक आजच मुलांना स्वतःपासून दूर ठेवण्याची सवय लावत आहेत. मग भविष्यात पुढे जाऊन मुलं तुम्हालाही तेच कारण सांगत असतील की, तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी मला वेळ नाहीय, तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी मला वेळ नाहीय, कारण माझी नोकरी आहे. माझा व्यवसाय आहे आणि मला पैसा कमवायचा आहे. त्यासाठीच मी तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवत आहे. तर मुलांचं काय चुकलं?

मुलांना लहानपणापासूनच तुम्ही वेगळं राहण्याची सवय लावलेली आहे. तुम्हीच त्यांना शिकवलेलं आहे की, पैसा कमावण्यासाठी वेगळं राहावं लागतं. दूर राहावं लागतं. मग भविष्यात तुम्हाला मुलांनी पैसे कमवण्यासाठी स्वतःपासून दूर ठेवलं तर त्यात मुलांचं काय चुकलं? थोडक्यात असंच म्हणावं लागेल की जैसी करणी वैशी भरणी किंवा आपण जसं पेरणार तसेच उगवणार.

हा लेख त्या पालकांसाठी नाही आहे. ज्यांना काही परिस्थितीमुळे मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवावं लागतं किंवा हा काही मुलांना काही परिस्थितीमुळे आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवावं लागतं. हा लेख त्या लोकांसाठी महत्त्वाचा आहे ज्यांना फक्त पैसे कमवण्यासाठी, आपले जीवन आनंदित आणि व्यवस्थित जगण्यासाठी आपल्या मुलांना दूर ठेवावं लागतं किंवा काही मुलांना आपलं आयुष्य व्यवस्थित जगण्यासाठी आपल्या आई-वडिलांना दूर ठेवावं लागतं.

पत्रकार- प्रसाद परब – संपादक – महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (9209391117)


Spread the love

Related posts

सावंतवाडीच्या उपरलकर स्मशानभूमीत सेवा देणाऱ्या “मारुती”चा सन्मान…!

news

कोंकण रेल्वे मार्गावर मंगळवारी मेगाब्लॉक ; दोन गाड्या उशिराने धावणार

news

मुंबई-पुणे द्रुतगती एक्सप्रेस हायवे ठरतोय मृत्यूचा सापळाच

news

Leave a Comment