वर्धा प्रतिनिधी: रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाचा पुढाकारमो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा वर्धा जिल्ह्यात दुचाकी अपघातांमधील मृत्यूंचे वाढते प्रमाण लक्षात घेता हेल्मेट सक्तीची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या निर्देशानुसार या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येत असून, तिची सुरुवात वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांपासून करण्यात आली आहे.या अंतर्गत रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या सर्व वाहतूक पोलिसांना हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. स्वतः नियमांचे पालन करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.तसेच, सर्व दुचाकी चालकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. हेल्मेटचा वापर केल्यास अपघातांमध्ये होणाऱ्या गंभीर दुखापती व मृत्यूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.याशिवाय, रात्रीच्या वेळी कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी रिफ्लेक्टर जॅकेट परिधान करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली.रस्ते अपघातांमध्ये घट घडवून आणणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे, हा या विशेष मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.
