सावंतवाडी: माणगाव तालुका कुडाळ येथे सावंतवाडी येथील “इनरव्हील”,या महिलांच्या सेवाभावी संस्थेमार्फत शेती क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देणे, बांधावर जाऊन वास्तवता जाणणे आणि आपल्यापरीने शेतकऱ्यांना मदत करणे असा त्रिवेणी स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या संस्थेच्या अध्यक्षा सौ.वैभवी शेवडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याशी हितगुज करण्यासाठी आलेल्या ग्रुपमध्ये प्रामुख्याने सौ. नीना कशाळीकर, सौ अन्नपूर्णा कोरगावकर, सौ. अनिता भाट,सौ.शकुन म्हापसेकर,सौ रिया रेडीज सौ ममता पाटणकर, सौ उल्का डिसूझा ,सौ. मीनल नाईक, सौ. साधना रेगे, सौ. प्रज्ञाली ढेरे,सौ. भारती देशमुख,सौ.देवता हावल, सौ. डॉ.नेत्रा सावंत,सौ. दर्शना देसाई यांचा समावेश होता. साधारणपणे आर्थिक दृष्ट्या वेल सेटल झालेल्या महिला या ग्रुपमध्ये असून आपण कोणाचे वैयक्तिक देणेकरी नसलो तरी, समाजाचे देणेकरी आहोत या उदात्त हेतूने त्या काम करत असतात. गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, गरीब शाळकरी मुलींना सायकल वाटप, विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करणे, आरोग्य विषयक परिसंवाद आयोजित करणे, शेतकऱ्यांना सेंद्रिय आणि गांडूळ खतांचे वाटप करणे आदी सामाजिक उपक्रम राबवले जातात.
माणगाव येथे प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन त्यानी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या,” शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपला बळीराजा शेतात राब राब राबून धान्य पिकवतो. तब्बल 140 कोटी जनतेची भूक भागवतो. यावेळी त्यांना शेतात काय काय करावे लागते याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या दृष्टीने आम्ही येथे आलेलो आहोत. सोबत त्यांना शेती क्षेत्राशी संबंधित मदत म्हणून सेंद्रिय व गांडूळ खत वाटप करत आहोत.आम्हाला शहरात धान्य कडधान्य, विविध भाजीपाला, मसाल्याचे पदार्थ, फळे सर्व बाजारात विकत मिळतात पण त्या वस्तू येतात कोठून ?त्या कशा पिकवल्या जातात ?त्यासाठी काय कष्ट सोसावं लागतं? हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष फिल्डवर आलो आहोत. सभोवतालचा निसर्ग रम्य परिसर पाहून भारावून गेलो. पृथ्वीवरचा स्वर्ग कसा असतो याची अनुभूती आम्हाला येथे आल्यावर झाली. कोकणच सौंदर्य अबाधित राखायचा असेल तर पर्यावरणाचे रक्षण झालंच पाहिजे. येथील फेसाळणारे समुद्रकिनारे आणि डोंगर – दर्यांनी नटलेला सह्याद्री हा कोकणच्या सौंदर्याचा आत्मा आहे. म्हणूनच येथील पर्यटनक्षेत्र नावारूपाला येत आहे. जर आम्ही पर्यावरण रक्षणाबाबत जागृत राहिलो नाही तर पुढच्या पिढ्या आम्हाला माफ करणार नाहीत. त्यामुळे भविष्यात वृक्ष संवर्धनासाठीही इनरव्हील ग्रुप मार्फत प्रयत्न करणार आहोत. शहरी भागातून आलेल्या सुशिक्षित महिला पाहून शेतकरी सुद्धा भारावून गेले. आपल्या कष्टाची महती जाणून घेण्यासाठी कोणीतरी दाद घेत आहे हे पाहून त्यांचा आनंद द्विगुणीत झाला. यावेळी त्यांच्यासोबत सोसायटीचे चेअरमन श्री.अवि राणे, सामाजिक क्षेत्रात काम करणारे श्री. महेश भिसे आणि श्री. गुरु पालकर हजर होते.
