सिंधुदुर्ग: जिल्हातील अवैध वाळू उपसा आणि बेदरकार वाहतुकीविरोधात महसूल विभागाने शुक्रवारी मध्यरात्री धडक मोहीम राबवली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास झाराप तपासणी नाक्याला भेट देऊन कारवाईचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या धडक मोहिमेत १५ अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच तोंडवली येथील वाळू उपशाचे अवैध रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमध्ये देवगड आणि दोडामार्ग वगळता जिल्ह्यातील अन्य सहा तहसीलदारांचा सहभाग होता. वाळू वाहतुकीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या कुडाळ-मालवण पट्ट्यात सर्वाधिक ९ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. वेंगुर्ला येथे ३ आणि वैभववाडी येथे २ गाड्यांवर कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या बेदकार वेगामुळे नागरिक त्रस्त होते. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी अपघाताची भीती वाढली होती, त्यामुळे प्रशासनाने ही कठोर पावले उचलली असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अवैध वाळूवर कारवाई करताना कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या गाडीला अपघात झाला होता, ज्यातून त्या थोडक्यात बचावल्या होत्या. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. या कारमुळे जिल्ह्यातील अवैध वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
