अहमदाबाद: १२ जून २०२६ रोजी एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाईनर विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच कोसळले होते. या भीषण अपघातात २६० जणांचा मृत्यू झाला. दोन्ही इंजिनमधील थ्रस्ट संपल्यानंतर सुमारे ३२ सेकंदांनी विमान एका वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर पडले होते. विमानाचे कमांडर सुमीत सभरवाल यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. मात्र इंडियन पायलट्स असोसिएशन तसेच सभरवाल यांच्या कुटुंबीयांनी या दाव्यांचा तीव्र निषेध केला आहे. त्यांच्या मते, कोणाला तरी दोषी ठरवण्याचा हा पूर्वनियोजित प्रयत्न आहे. विमान निर्माता कंपनी, एअरलाइन व्यवस्थापन आणि इतर घटकांचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ ड्रीमलाईनर विमानाच्याअपघातबाबत इटलीतील एका वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार, भारतीय तपास यंत्रणा आपल्या अंतिम अहवालात असे नमूद करू शकते की एअर इंडियाची फ्लाइट १७१ ही एका पायलटच्या कृतीमुळे कोसळली. पश्चिमी विमानन संस्थांच्या सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आलेल्या या दाव्यात म्हटले आहे की, संबंधित पायलटने ‘जवळपास जाणीवपूर्वक’ विमानातील फ्यूल स्विच बंद केले होते. पायलटने ‘जाणीवपूर्वक’ फ्यूल स्विच बंद केल्याचा दावाइटलीच्या कोरिएरे डेला सेरा या वृत्तपत्राच्या अहवालानुसार, अंतिम तपास अहवालात असे नमूद होऊ शकते की फ्लाइट १७१ अपघाताचे कारण म्हणजे एका पायलटने जाणीवपूर्वक फ्यूल स्विच ‘रन’वरून ‘कटऑफ’ स्थितीत हलवले. या निष्कर्षांचा आधार कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगचे विश्लेषण आणि विमानात कोणतीही तांत्रिक बिघाड आढळला नसल्याची बाब असल्याचे सांगितले जाते.
डिसेंबरमध्ये भारतीय विमान अपघात तपास ब्युरो (AAIB)चे अधिकारी वॉशिंग्टन येथे गेले होते. त्यांनी तेथे नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डच्या प्रयोगशाळेत ब्लॅक बॉक्समधील डेटाचे पुनर्विश्लेषण केले. विशेषतः कॉकपिट ऑडिओ रेकॉर्डिंगवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या ऑडिओ विश्लेषणातून कोणत्या पायलटने घातक कृती केली, याबाबत स्पष्टता आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अमेरिकन तज्ज्ञांनी बोईंग ७८७ सिम्युलेटर चाचण्यांमध्ये दोन्ही इंजिन तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याचे कोणतेही संकेत सापडले नाहीत, असे अहवालात नमूद आहे. त्यामुळे हा अपघात मानवी हस्तक्षेपामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डरच्या आधारे काही पाश्चात्य तज्ज्ञांनी सभरवाल यांच्याकडे संशयाची सुई निर्देशित केल्याचेही सांगितले आहे. प्रथम डावे आणि त्यानंतर उजवे इंजिन बंद झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अपघातानंतर एक महिन्याने जाहीर झालेल्या प्राथमिक अहवालातही फ्यूल स्विच ‘रन’वरून ‘कटऑफ’ स्थितीत हलवण्यात आल्याचा उल्लेख होता. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एक पायलट दुसऱ्याला “तुम्ही इंजिन का बंद केले?” असे विचारतांना ऐकू येते. त्यावर दुसऱ्या पायलटने “मी केले नाही” असे उत्तर दिल्याचे नोंद आहे. मात्र त्या वेळी कोणत्या पायलटने कोणते विधान केले, याची स्पष्ट माहिती देण्यात आलेली नव्हती.
