सावंतवाडी: तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार दिनांक ०६ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथील हॉटेल अयोध्याच्या सभागृहात थाटात संपन्न झाला. या सोहळ्यात कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर (दीपी) यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाला “सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह”, मालवण शाखेच्या सदस्या सौ. उज्ज्वला धानजी यांच्या “आठवणींच्या हिंदोळ्यावर” लेख संग्रहाला “सर्वोत्कृष्ट लेखसंग्रह” आणि ज्येष्ठ सदस्य श्री दत्तात्रय शिवराम हिर्लेकर गुरुजी यांच्या “कर्तव्यपूर्ती” ला “सर्वोत्कृष्ट आत्मचरित्र” असे तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामुळे तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार सोहळ्यात कोमसाप सदस्यांनी हॅट्ट्रिक केल्याचे पाहायला मिळाले. द. शि. हिर्लेकर (वय ९८) यांचा पुरस्कार त्यांचा पुत्र शशांक हिर्लेकर याने स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष राष्ट्रपती पदक विजेते पर्यावरण तज्ञ ॲड. तुषार शिवशरण, सोल्यूशन माईंडचे सुजित दातार, माजी आम.जयश्री जाधव, कोळी नटसम्राट लोककलाकार राजेश खर्डे वेसावकर, ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री शमा वैद्य, अभिनेत्री वैशाली राजशेखर, अभिनेत्री जयमाला इनामदार, अभिनेत्री चित्रा साठे, शंकर अंदानी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. तितिक्षाच्या अध्यक्ष प्रिया दामले यांनी प्रास्ताविक करताना, “मराठी भाषेतील दर्जेदार साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी तितिक्षा भावार्थ पुणे या संस्थेकडून सर्वोत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी हे आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात” असे सांगत हा सोहळा आयोजित करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. स्वागताध्यक्ष ॲड.तुषार शिवशरण यांनी आपल्या मनोगतात पर्यावरण रक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देत तितिक्षाच्या उपक्रमाचे कौतुक केले. माजी आमदार जयश्री पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त करून सन्मानप्राप्त साहित्यिकांचे अभिनंदन केले आणि पुरस्कार सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. आयोजकांच्या वतीने प्रिया प्रमोद दामले आणि सुजित दातार यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल, सन्मानचिन्ह देत गौरव करण्यात आला. यावेळी निमंत्रित कवींचे कवी संमेलन संपन्न झाले. कवी दीपी यांनी सादर केलेली “डोळ्यात बापाच्या मला सुखदुःख सारे काय दिसते…. अन् पापणी लवताच माझी राबणारी माय दिसते” ही रचना अनेकांच्या पसंतीस उतरली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या जोडप्याचा शाल, मानाची टोपी, साडी देत मुंडावळ्या बांधून मंगलाष्टकांच्या मंजुळ स्वरात विवाहाचा विशेष सोहळा संपन्न करण्यात आला. सदरचा सोहळा तितिक्षा इंटरनॅशनल पुणे, सोलुशनमाईंड पुणे व श्रीद्या क्रिएशन यांनी संयुक्त आयोजित केला होता. आयोजकांनी आयोजनात विशेष सहकार्य केलेल्या अजिता मुळीक, गौरव पुंडे, भालचंद्र शिर्के यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया दामले आणि श्री गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी केले. पुणे येथून येऊन कोल्हापूर मध्ये असा दैदिप्यमान सोहळा केल्याने संस्थेचे सर्वांनी कौतुक केले.
