महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
डोंबिवली | प्रकाश संकपाळ : डोंबिवलीतील अनधिकृत डान्सबारांविरोधातील कारवाईचा सिलसिला सुरू असतानाच मानपाडा पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली. मानपाडा पोलीस ठाण्यापासून फक्त हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘तनिष्का बार’मध्ये नियमबाह्य डान्सबार चालविला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अचानक धाड टाकली.या कारवाईत बार व्यवस्थापक, कर्मचारी, नर्तिका आणि ग्राहकांसह एकूण २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारमध्ये परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून अश्लील हावभावांसह नृत्य सादर केले जात होते. ग्राहकांकडून नर्तिकांवर पैसे उधळले जात असल्याचेही समोर आले.कारवाईदरम्यान पोलिसांनी बारमधील रोख रक्कम, ध्वनीप्रणाली व अन्य साहित्य जप्त केले. महाराष्ट्र पोलीस अधिनियमसह संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.विशेष म्हणजे, पोलीस ठाण्याच्या इतक्या जवळ बेकायदेशीर डान्सबार सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. यापूर्वीही डोंबिवली परिसरात अशा अनेक कारवाया झाल्या आहेत, तरीही पुन्हा असा प्रकार घडल्याने कायद्याची अंमलबजावणी आणि देखरेख यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.पोलिसांनी आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली असून, बारच्या परवान्याचीही सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले आहे.
