स्टोरी

नद्यांची घुसमट थांबविणार कोण?

Spread the love

सिंधुदुर्ग: काही दिवसातच मान्सूनचे आगमन होणार आहे. सिंधुदुर्ग हा तळकोकणातील भरपूर पर्जन्यवृष्टी होत असलेला जिल्हा आहे. थोड्याशा पावसानेही नदीकाठच्या गावांमध्ये पूर येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याच्या घटना अलीकडे दरवर्षीच्या पावसाळ्यात घडत आहेत. यावर्षीही मान्सूनकाळात त्याचीच पुनरावृत्ती झाल्यास नवल वाटण्याचे मुळीच कारण नाही. नद्या गाळाने भरलेल्या असताना यापेक्षा दुसरे काय होणार? आमच्या जीवनदायिनी अक्षरश: गुदमरत आहेत. त्यांचा श्वास रोखण्याचा अधिकार मनुष्यास आहे का ? पुरामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार धरावे तर कुणाला, असे अनुत्तरीत प्रश्न ठळकपणे अधोरेखित होत आहेत.

नदीच्या पात्रात वाढलेल्या झाडांमध्ये लुप्त झालेला प्रवाह.

सुयोग्य नियोजनाअभावी पावसात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या एप्रिल-मे महिन्यात पूर्णपणे रखरखीत झालेल्या असतात, हे आमचे कोकणचे वास्तव आहे. बेसुमार पडणाऱ्या पावसाच्या पाणी साठवणीचे कोणतेही नियोजन येथे नाही. केवळ नदीत असलेले पाणी वाहत जाऊन समुद्राला मिळण्याऐवजी ते भूगर्भात साठविण्यासाठी ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ ही एकमात्र योजना गावागावातील नद्यांवर राबविलेली दिसते. यासाठी नद्यांवर ठिकठिकाणी बंधारे घातले गेले आहेत. भूगर्भातील पाणी साठवणीसाठी ही उत्तम योजना आहे; हे खरे असले तरीही त्यामुळे होत असलेल्या इतर परिणामांवरील उपाययोजनांची तजवीज आजपावेतो झालेली दिसत नाही.

सर्वत्र वाढलेल्या झाडांमध्ये नदीचे पात्र शोधावे लागत आहे.

गावांमधून वाहणाऱ्या नद्या जरी हंगामी असल्या तरीसुद्धा त्या गावांच्या जीवनदायिनी आहेत. गावाची जैवविविधता समृद्ध करणारी ती एक जलीय परिसंस्था आहे. सद्ध्या या नद्यांचा श्वास कोंडत आहे. प्रवाहितपणा हा स्वाभाविक गुणधर्म असणाऱ्या या नद्यांना स्वतःचे मार्ग बदलावे लागत आहेत. नद्यांचा पारंपरिक मार्ग बुजला जात आहे. ‘तेरेखोल’ सारख्या मोठ्या नद्या वगळता अन्य छोट्या नद्यांचे मार्ग दिसतच नाहीत. तिची वळणे राहिलीच नाहीत. नद्यांचे मार्ग लुप्त होत जाणे ही फार मोठी समस्या आहे. याचे अत्यंत विपरीत परिणाम आत्तापासूनच जाणवू लागले आहेत.

हे जंगल नसून नदीचे पात्र आहे.

बंधाऱ्यांमुळे नदीतील गाळ वाहून न जाता तळावरच साचून राहतो. यामुळे नद्यांची पात्रे गाळाने भरली आहेत. एवढेच नव्हे तर या गाळावर चक्क नदीच्या पात्रात मोठी झाडे व झुडुपे वाढली आहेत. रखरखीत झालेल्या पात्रांमध्ये सर्वत्र पाण्याबरोबर वाहून आलेले सामान आणि गाळावर वाढलेली झाडेझुडुपेच दिसत आहेत. पूर्वी पाऊस अति जास्त झाला तरच गावात पाणी शिरत होते. तेसुद्धा घरांना स्पर्श करून येण्याइतपतच असायचे. आता थोडासा पाऊस वाढला की गावांमधील घरांमध्ये पाणी शिरते. मागच्या काही वर्षांपर्यंत कधीतरी दिसणारा पूर आता नेहमीचाच झाला आहे. पावसावर अवलंबून असणाऱ्या भातशेतीचे, नारळ, सुपारी उत्पादक शेतकऱ्यांचे सातत्याच्या पुरामुळे प्रचंड नुकसान होते.

नदीत साचलेल्या गाळावर वाढलेली झुडूपे

नदीचे पात्र म्हणून जी जागा परंपरेने चालत आलेली होती, त्या जागेवर सध्या नदीचे अस्तित्व शोधावे लागत आहे, यासारखे दुर्दैव नाही. प्रत्येक गावातील प्रत्येक नदीला तिच्या हक्काची जागा मिळालीच पाहिजे. या नद्यांमध्ये स्थानिक पातळीवरील अनेक जलचर आहेत. अलीकडे, नदीपात्रेच राहिली नसल्याने त्यातील काही जलचर दिसतही नाहीत.

गावांमधील स्थानिक नद्यांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण मासे आढळत होते. यामध्ये ‘काडी’, ‘ठीगुर’, ‘टोळ’, ‘शेंगटे’, ‘मरल’, ‘खवळा’, ‘ढेकळा’, ‘दांडकळ’, ‘खडस’, ‘वाळव’, ‘कर्जुवा’, ‘झिंगा’, ‘सुळे’, ‘मळवा’,’डेम्बुक’, ‘शिवड’, ‘खर्ची’, ‘केर’, ‘तामोशी’, आदी माशांचा समावेश होता. यातील काही मासे नाहीसेच झाले आहेत. याचाच अर्थ, या स्थानिक प्रजाती नाहीशा होऊ लागल्या आहेत, कदाचित झाल्याही असतील. याशिवाय ‘मगर’, ‘हैर’, ‘हिवाळे’, ‘पाणघणस’ हे प्राणी तसेच ‘हुदा’ म्हणजेच ‘पाणमांजरे’ या प्राण्यांचाही मुक्त संचार या नद्यांमध्ये असे. यातील अनेक प्राण्यांचे निवासस्थानच धोक्यात आले आहे. ही पर्यावरणदृष्ट्या गंभीर समस्या आहे.

कोकणात अतिपर्जन्य असल्याने पावसाळ्यात नद्या पूर्ण क्षमतेने वाहणार, हे निश्चितच आहे. अनेक मोठ्या अडथळ्यानी प्रवाहाचा मार्ग रोखून धरला असल्याने या नद्यांनी प्रवाह बदलल्यास व त्यामुळे नुकसान झाल्यास याला नैसर्गिक आपत्ती म्हणता येईल का?

नदी हा पर्यावरणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. नदीची पात्रे पूर्ववत स्वच्छ आणि मोकळी व्हायला हवीत; अन्यथा सह्याद्रीकडून समुद्राकडे वेगाने धावणारे पाणी पारंपरिक पात्रे बदलतील. यामध्ये तळकोकणातील शेतकरी वर्गाचे फार मोठे नुकसान होणार आहे.

अशा स्थितीत नदीचे प्रवाह बदलतील यात शंकाच नाही !

कशा हव्यात पर्यटन जिल्ह्यातील नद्या?

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा आहे. कोकणातील गावे म्हणजे पर्यटकांचे आकर्षण असते. येथील नद्यांचे पर्यटकांनी काय चित्र पहावे ? केवळ दिखाव्यासाठी नदीतील गाळ काढून उपयोग होणार नाही. शासनाने गावांमधील नद्यांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. ज्यापद्धतीने जमिनींचा सर्व्हे करून सीमा निर्धारित केल्या जातात, त्याप्रमाणेच प्रत्येक नदीचा सर्व्हे करून तिच्या सीमा निश्चित केल्या गेल्या पाहिजेत. उगमापासून समुद्राला मिळेपर्यंतचा नदीचा प्रवास विनाअडथळा झाला पाहिजे. नद्या पुनर्जीवित होणे ही काळाची आणि येथील पुढच्या प्रत्येक पिढीची आत्यंतिक गरज आहे.

गावांना वाली कोण?

शासकीय पातळीवर देशातील, राज्यातील पर्यावरणाचा विचार केला जातो. गावांकडे कुणी पहावे? पर्यटन, कृषी, ग्रामविकास, जलसंवर्धन अशा सर्वच क्षेत्रांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. गावातील नद्यांची पात्रे मोकळी करण्यासाठी शासन, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. नद्यांची दुरवस्था सर्वसामान्य जुन्याजाणत्या नागरिकांसह पर्यावरणप्रेमींच्या मनास चटका लावून जाते. सिंधुदुर्गातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या या जलवाहिन्यांच्या पात्रातील सर्व अडथळे नष्ट करून त्यांना मोकळा श्वास घेऊ द्यावा, यासाठी कार्यवाही होणे गरजेचे आहे.

सौ. मंगल नाईक-जोशी सावंतवाडी. संपर्क: ९४०५८३१६४६


Spread the love

Related posts

कोकण रेल्वे मागांवरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला!

news

“छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची सीमारेषा शोधण्यासाठी लांब जावं लागलं नसतं….गृहमंत्री अमित शहा.

news

मसुरे कावावाडी येथे ९ डिसेंबरला हरिनाम सप्ताह….!

news

Leave a Comment