सावंतवाडी प्रतिनिधी:
सावंतवाडी शहरात घरगुती गॅस वाहिनी टाकण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या कामादरम्यान रस्ते खोदताना नळधारकांच्या घरगुती जलवाहिन्यांसह नगरपरिषदेच्या मुख्य पाणीपुरवठा जलवाहिन्याही मोठ्या प्रमाणावर फुटत असल्याचे समोर आले आहे. या फुटलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागावर येत असून, त्यासाठी लागणारा साहित्य व मनुष्यबळाचा खर्च नगरपरिषदेच्या तिजोरीतून होत .
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध भागांत गॅस वाहिनीचे काम सुरू असताना वारंवार जलवाहिन्या तुटून पाणी वाया जात असल्याची छायाचित्रे आणि बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. परिणामी काही भागांत पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतत दुरुस्तीची कामे करावी लागत असून, मे महिन्यातच विक्रमी संख्येने नळजोडण्या आणि जलवाहिन्या तुटल्यामुळे दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्यावर लाखो रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, संबंधित गॅस वाहिनी टाकणाऱ्या कंपनीने नगरपरिषदेकडे काही रक्कम अनामत म्हणून जमा केली असल्याचे सांगितले जाते. मात्र ही अनामत रक्कम केवळ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वापरली जाणार आहे की जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या खर्चासाठीही वापरली जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जर जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च नगरपरिषद स्वतःच्या निधीतून करत असेल, तर तो खर्च अखेरीस करदात्यांच्या पैशातूनच होत आहे. गॅस वाहिनीच्या कामामुळे झालेल्या नुकसानीचा आर्थिक बोजा सर्वसामान्य करदात्यांवर पडणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत नगरपरिषद प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करून, गॅस वाहिनीच्या कामामुळे झालेल्या जलवाहिन्यांच्या नुकसानीची जबाबदारी संबंधित कंपनीवर निश्चित करावी, तसेच करदात्यांच्या पैशांचा अतिरिक्त बोजा टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
