अक्कलकोट प्रतिनिधी: साक्षात ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांचं सहवास लाभलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील वटवृक्ष हा केवळ एक वृक्ष नसून तो साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रतीक आहे, म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी या वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे प्रत्यक्ष स्वामींचीच पूजा केल्याचे समाधान अनेक सौभाग्य वतींना लाभते.आपल्या भारतीय संस्कृतीतील या पवित्र सणाची परंपरा जपण्यासाठी श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान सदैव कटिबद्ध असल्याचे मनोगत देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आज वटपौर्णिमेच्या दिवशी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात वटसावित्रीने सुरू केलेले हे महान कार्य असंख्य सौभाग्यवती महिलांनी वटवृक्षाला सौभाग्याची दोरी गुंडाळत वटवृक्षाची पूजा केल्याने वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने पार पडला.यावेळी सौभाग्यवती महिलांनी साजरा केलेल्या या उत्सवाप्रित्यर्थ चेअरमन महेश इंगळे बोलत होते. पुढे बोलताना चेअरमन महेश इंगळे म्हणाले की भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेस व वडपुजेस अनन्यसाधारण महत्व आहे.आज पहाटे ६ वाजल्यापासून असंख्य सुवासिनी महिलांनी अपार श्रद्धेने वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाची वडपूजा करून हा सण साजरा केला. श्री स्वामी समर्थांचा सहवास लाभलेल्या वटवृक्षास धार्मिक व ऐतिहासिक महत्व असल्याने येथे दरवर्षी वटपौर्णिमेस वडपुजेसाठी असंख्य महिला भक्त गर्दी करून वटसावित्रीने सुरु केलेली हि वडपूजा परंपरेप्रमाणे दरवर्षी स्वामींच्या दरबारी साजरी करतात. वडपूजा करण्यासाठी स्थानिक महिलांबरोबरच परगावाहून आलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती, तसेच दरवर्षी वडपूजे करिता येणाऱ्या महिलांची संख्या वाढतच आहे असे सांगीतले.
मंदीरातील वटवृक्षाची पुजा करून आपले जीवन सार्थक झाले आहे. या वटवृक्षाच्या रुपातून साक्षात श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद आपणास लाभले असल्याचे मत काही महिला भगिनींनी व्यक्त केले. सौभाग्यवती महिलांनी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून सात फेऱ्या मारल्या व पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. देवस्थान समितीच्या वतीने पूजेसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
वटपौर्णिमेच्या पाश्वभुमीवर आज श्रींच्या दर्शनाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. पहाटे ४ वाजल्या पासूनच भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली होती. भाविकांच्या दर्शनाकरिता मंदिर समितीच्या वतीने विशेष सोय करण्यात आली होती. तसेच भक्तांच्या दर्शनाच्या व इतर सोयीकरिता व त्यांच्या सुरक्षितते करिता समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे विश्वस्त, कर्मचारी व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. दिवसभर मंदिरात स्वामींच्या नामस्मरणाच्या जयजयकाराने आसमंत दुमदूमला.यावेळी देवस्थानचे पुरोहित मंदार पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, संतोष पराणे, दीपक जरिपटके, प्रसाद सोनार, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, संजय पवार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
