सावंतवाडी प्रतिनिधी: आंबोली-दोडामार्ग भागात बेकायदेशीर शिकार करणाऱ्या आंतरजिल्हा टोळ्यांचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ८ आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. आरोपींकडून गावठी ठासणीची बंदूक, काडतूस बंदूक, जिवंत व वापरलेली काडतुसे, तलवार, विजेऱ्या, एक आलिशान एमजी हेक्टर गाडी आणि शिकार केलेले दुर्मिळ वन्यजीव जप्त करण्यात आले आहेत. मासुरु येथील शासकीय जंगलात वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या परिशिष्ट-१ अन्वये सर्वोच्च संरक्षण प्राप्त असलेल्या साळिंदर या वन्यजीवाची शिकार करून घेऊन जात असताना वनविभागाने पहिली कारवाई केली. रात्रीच्या अंधारात विजेरीच्या प्रकाशात शिकारीसाठी फिरणाऱ्या विठू वाघू कोकरे (वय ४५, रा. ) चुरणीचीमुस चौकुळ, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग याला वनविभागाच्या पथकाने सुमारे दीड किलोमीटर पाठलाग करून जंगलात पुराव्यासाहित ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी ठासणीची बंदूक, बंदुकीने ठार केलेले मृत साळिंदर, हेड टॉर्च आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ आणि भारतीय वन अधिनियम १९२७ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई ताजी असतानाच मौजे नेने वन कक्ष क्रमांक १८१ मधील शिरगांवकर पॉईंट येथे वनविभागाला दुसरी टोळी पकडण्यात यश आले. पहाटेच्या सुमारास जंगलात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इसमांचा पाठलाग करून त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे १ नळी काडतूस बंदूक, ७ जिवंत काडतुसे, १० वापरलेली काडतुसे, तलवार आणि शिकार केलेले मृत गेळा/पिसोरी (माऊस डीयर) व १ कटीदर/फटकुरा (एशियन पाम सिव्हेट) हे वन्यजीव आढळून आले.या कारवाईदरम्यान पवन प्रकाश देसाई (रा. कडगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), जावेद सलीम जमादार (रा. यादव नगर मेन रोड, कोल्हापूर), हसीम हुसेन काजी (रा. तिरवडे कडगाव, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), भरत नवलू पाटील (रा. चौकुळ, जळववाडी नेने, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), वनु विठ्ठल फोंडे (रा. एरंडपे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर), गणेश तुकाराम पाटकर (रा. पिंपरी चिंचवड, नवी सांगवी, पुणे) आणि आकाश मोहन कुरणे (रा. यादव नगर, कोल्हापूर, जि. कोल्हापूर) या संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले.त्याच वेळी या शिकाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी कोल्हापूर येथून आलेली आलिशान एमजी हेक्टर गाडी (क्रमांक MH09GF 0014) वनविभागाच्या पथकाला आढळून आली. पथकाने तत्परता दाखवत गाडीतील सोबत्यांसह शिकार करणाऱ्या इतर आरोपींना वाहनासह घटनास्थळावरच अटकाव करून ताब्यात घेतले.सदर धडक कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक (प्रा.) मा. श्री. मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) श्री. वैभव सा. बोराटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
वनविभागाच्या या मोहिमेत आंबोलीचे वनक्षेत्रपाल श्री. वैभव भिसे, चौकुळचे वनपाल श्री. नामदेव चौगले, देवसूचे वनपाल श्री. म्हैबुब नायकवडे, आंबोलीचे वनपाल श्री. सम्राट पाटील, आंबोलीचे वनपाल श्री. अनिकेत आवारे, सावंतवाडीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल तथा सहाय्यक वन्यजीव अधीक्षक श्री. गौरेश राणे, सहाय्यक वन्यजीव अधीक्षक तथा वनरक्षक श्री. रविंद्र पाटील, तपासणी नाके आंबोलीचे वनरक्षक श्री. संग्राम पाटील, नेनेचे वनरक्षक श्री. तानाजी चव्हाण, केगदचे वनरक्षक श्री. वासुदेव खोत, नांगरतासचे वनरक्षक श्री. अनिकेत देशमुख आणि आर. आर.टी. टीमने विशेष परिश्रम घेतले.
पश्चिम घाटातील जैवविविधतेचे केंद्र असलेल्या आंबोली येथे वन्यजीवांच्या मुख्य अधिवासात पर्यटक म्हणून येणाऱ्या काही शिकाऱ्यांमुळे निसर्गाची अन्नसाखळी धोक्यात येत आहे, असे सांगत उपवनसंरक्षक मा. श्री. मिलीश शर्मा यांनी जैवविविधता अबाधित राखण्यासाठी वनविभाग कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. तसेच परिसरात शिकारीच्या उद्देशाने कोणी संशयास्पदरित्या फिरताना आढळल्यास नागरिकांनी त्वरित आंबोलीचे वनक्षेत्रपाल श्री. वैभव वि. भिसे यांच्या ९५०३९ ७३८०२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
