पावनखिंड (जि. कोल्हापूर) संतोष परब: हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तिथीनुसार नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानदिनानिमित्त ३० जुलै रोजी ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन करण्यात आले होते. भरपावसात पार पडलेल्या या मोहिमेमुळे उपस्थितांमध्ये नवचेतना जागृत झाली. पन्हाळा येथे नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या मोहिमेला नरवीर बाजीप्रभूंचे वंशज श्री. संदेश देशपांडे व नीलेश देशपांडे, सरदार कमळोजी साळुंखे यांचे वंशज श्री. सुहासदादा साळुंखे आणि नरवीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद यांची विशेष उपस्थिती होती. ‘आई वाघजाई देवी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे’, ‘नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि नरवीर शिवा काशीद यांचा विजय असो’, ‘नमोः पार्वतीपते हर हर महादेव’ आदी घोषणांनी पावनखिंड परिसर क्षात्रतेजाने दुमदुमून गेला.

यावेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात पूर्णतः स्वदेशी तंत्र विकसित केले होते. आज स्वातंत्र्यानंतरही आपण आपले ‘स्व’राज्य निर्माण करू शकलो नाही. शिवछत्रपतींचे स्वराज्य ‘अटक ते जिंजी’ सुमारे १५०० किमी विस्तारले होते. बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, फुलाजीप्रभू यांसारख्या मावळ्यांचा आदर्श ठेवून हिंदु राष्ट्रासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प करा.

सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांनी संघर्षातून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हिंदु राष्ट्रही संघर्षाशिवाय मिळणे अशक्य आहे. रामराज्य स्थापनेसाठी प्रत्येकाने प्रतिदिन ‘श्रीराम जय राम जय जय राम’ नामजप करावा.’’ नरवीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद म्हणाले, ‘‘पावनखिंडीत असंख्य मावळ्यांचे बलिदान झाले आहे. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन इतिहास केवळ स्मरणात न ठेवता तो आपल्या आचरणातून जगला पाहिजे.’’

विशेष आकर्षण व सत्कार: या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील सरदार कमळोजी साळुंखे यांनी वापरलेली ऐतिहासिक तलवार आणि शिवकालीन पट्टा उपस्थितांना दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. तसेच १०७ वेळा रक्तदान करणारे ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. अनिश पोतदार यांचा श्री. रमेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मलकापूरच्या नगराध्यक्षा सौ. रश्मी कोठावळे, नगरसेवक महेश कोठावळे, सरपंच चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महेश विभूते, हिंदु महासभेचे उपाध्यक्ष विकास जाधव, डॉ. अश्विनी माळकर, सौ. मनीषा वाडीकर, योगेश केरकर, अशोक गुरव, प्रसाद कुलकर्णी, डॉ. मानसिंग शिंदे, डॉ. शिल्पा कोठावळे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
आपला नम्र, श्री. सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती, (संपर्क क्र.: ७०२०३८३२६४)
