मसुरे प्रतिनिधी: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट बुद्धिमत्ता आणि जिद्द असते. फक्त त्यांना योग्य संधी आणि सोयी-सुविधांची गरज असते. यज्ञेशने मिळवलेले यश हे केवळ त्याचे नसून संपूर्ण शाळेचे आणि गावाचे कौतुक आहे. पैशांअभावी किंवा साहित्याभावी कोणत्याही गरजू विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हीच आमची भावना आहे. याच उद्देशाने आम्ही या वर्षी दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेत आहोत, जेणेकरून त्यांनी कोणतीही चिंता न करता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. भविष्यातही या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना आमचे सहकार्य कायम राहील असे प्रतिपादन उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी वायंगणी हायस्कुल येथे केले. सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईचे संचालक श्री. प्रकाश मेस्त्री यांनी ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी येथे दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेला विद्यार्थी कु. यज्ञेश राजेश गोलतकर (८९.६०%) याला कै. वसंत दिनकर मेस्त्री स्मृती पुरस्कार ५५५५ रुपयांचा धनादेश देऊन गौरविले. त्याचप्रमाणे चालू वर्षातील दहावीचे दोन विद्यार्थी कु. सोनिया तोंडवळकर व कु. कैवल्य सावंत यांना दत्तक घेऊन त्यांना वर्षभरात शैक्षणिक साहित्य व सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सूचित केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत प्रभू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मेस्त्री कुटुंबाचे आभार मानताना सांगितले की,”शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करणे आणि गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा श्री. प्रकाश मेस्त्री यांचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशा दातृत्वामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी ऊर्मी आणि प्रोत्साहन मिळते. यज्ञेशने खडतर परिस्थितीत मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. संस्थेच्या वतीने मी मेस्त्री कुटुंबियांचे मनापासून आभार मानतो आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो.”आज छोटेखानी झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम संस्था अध्यक्ष श्री. हनुमंत प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक श्री. टकले सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
