सावंतवाडी: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने मोती तलावाच्या सांडव्याजवळ उभारलेली आकर्षक शिल्पे आता जाहिरात फलकांमुळे झाकली गेली आहेत. नगरपरिषदेच्या या कारभारामुळे पर्यटनाला हरताळ फासला जात असल्याची टीका होत असून, या प्रकारामुळे न्यायालयाच्या आदेशाचाही अवमान होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. शहरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोती तलावाच्या सांडव्याजवळ वाघ, हरण आणि बगळे यांची शिल्पे उभारण्यात आली होती. मात्र, आता या ठिकाणी जाहिरात फलक लावण्यात आल्यामुळे ही शिल्पे पर्यटकांच्या नजरेआड झाली आहेत.
या गंभीर प्रकाराकडे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांचे लक्ष वेधण्यात आले होते; मात्र त्यांनी याकडे पूर्णपणे कानाडोळा केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तसेच, मोती तलाव परिसरातील फुटपाथवर स्टाईल टाकण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत असून, त्यातच पर्यटन स्थळांवर अशा प्रकारे माती आणि बॅनर्स लावल्याने पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराबाबत नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि नगरसेवक हे सर्व सहन कसे करतात? असा संतप्त प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.या प्रकारामुळे सावंतवाडीच्या पर्यटन सौंदर्याला बाधा पोहोचत असून, नगरपरिषदेने तातडीने हे जाहिरात फलक हटवून शिल्पे पर्यटकांसाठी खुली करावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
