सावंतवाडी प्रतिनिधी: कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय येथे मराठी भाषा दिन व विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा जागर करत प्रत्येक गावात आता मराठी शाळा टिकायला हव्यात. या दृष्टीने संकल्प केला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना संतोष सावंत यांनी अभिजात आमची माय मराठी, दुधावरची जशी साय मराठी, गडकोटातून अजूनही नाद निनादतो असे मराठी भाषेबद्दल व्यक्त होत भाषा आणि विज्ञान शास्त्र याची योग्य सांगड घातल्यास निश्चितपणे नाविन्याचा शोध आपल्याला लागतो. विज्ञान दिवस म्हणजे काय? आपण कधी विचार केला आहे का? मोबाईल मधून आवाज कसा पोहोचतो? असे प्रश्न आणि शोध आपण घ्यायला हवं. विज्ञान हे आपल्या अवतीभवती जे घडतंत्याचा शोध घेण म्हणजे विज्ञान होय. विज्ञानाची जिज्ञासा आपल्याला असायला हवी. असे त्याने स्पष्ट केले.

शनिवारी २८ फेब्रुवारीला २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिन आणि विज्ञान दिन असे एकत्रित उपक्रम हायस्कूलमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे तर विज्ञान दिनानिमित्त सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ अर्चना सावंत, विज्ञान शिक्षक मिहीर राणे, शिक्षका सौ. कांबळी आधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे विद्यार्थी प्रवीण जंगले याने भूषवले. त्यांनी मराठी भाषेचा उगम यावर पोवाड्याच्या रूपात मराठी भाषेचा जागर केला.
यावेळी मुख्याध्यापिका सौ सावंत पुढे म्हणाल्या, शिवरायांच्या ललकारीत मराठी मराठी भाषा जगात भारी असा आपण म्हणतो. पण ते कशामुळे? हे तुम्हाला माहित आहे का? एक तर मराठी केवळ भाषा नाही तर ती आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. सुमारे पंधराशेवर्षाचा समृद्ध इतिहास असलेल्या आपल्या मराठीची मूळ प्राचीन इतिहास प्राकृत मध्ये सापडतात. तेराव्या शतकात संतांनी मराठीला लोक भाषा बनविल. संत ज्ञानेश्वरांनी याच मराठी भाषेत, ज्ञानेश्वरी लिहून भगवद्गीतेचे ज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं. संत तुकारामाचे अभंगांनी समाज प्रबोधन केले. त्यानंतर शिवछत्रपतींच्या काळात मराठीला राजभाषेचा बहुमान मिळाला. महाराजांनी मराठीला प्रशासकीय व्यवहारातही वापरलं. आज मराठी ही भाषा भारताच्या प्रमुख भाषांपैकी एक आहे. गोड, स्पष्ट, रसाळ, मधुर आणि अभिमानाने भरलेली आपली मराठी, आज साहित्य नाटक,पत्रकारिता अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये साता समुद्र पार पोचले आहे. आणि आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे. मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. कुसुमाग्रज म्हटले की त्यांची… ओळखलत का सर मला, ही कविता आठवते. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. अशा कुसुमाग्रजांच्या ओळींनी अनेकांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढायचं कसं? ही प्रेरणा दिली. कुसुमाग्रज हे त्यांचे टोपण नाव. त्यांचे खरे नाव विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि. वा.शिरवाडकर. नाटककार, कादंबरीकार,लघु निबंधकार, प्रतिभावंत साहित्य कवी आणि चांगले समीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांनी साहित्य कृतीला योगदान दिले आहे. नटसम्राट या साहित्य कृतीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. हे त्यांचे योगदान आणि त्यांची प्रतिभा लक्षात घेऊन २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. म्हणून आजच्या या गौरव दिनानिमित्त आपल्या माय मराठीला अजून समृद्ध आणि जपण्याची शपथ घेऊया असे त्या म्हणाल्या.

सौ. सावंत पुढे म्हणाल्या आज २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा दिवस म्हणजे कॅलेंडर मध्ये केवळ एक तारीख नाही तर तो जिज्ञासेचा, शोधाचा आणि नव्या विचारांचा दिवस आहे. तुम्ही कधी आकाशाकडे पाहून विचार केला आहे का? तारे का चमकतात.. इंद्रधनुष्याला रंग कसे येतात? मोबाईल मधून आवाज कसा पोहोचतो? या प्रत्येक का?आणि कसे? यांच्या मागे विज्ञान उभे आहे. विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील धडे नाही तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा अर्थ समजून घेण्याची वृत्ती आहे. हा दिवस महान भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही.रामन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यांनी प्रकाशाच्या गुणधर्मावर संशोधन करून रमण इफेक्ट हा महत्त्वाचा शोध लावला. आणि त्यांचे नाव भारतभर प्रसिद्ध झाले. त्यांच्या कार्यासाठी त्यांना नोबेल प्राईज इन फिजिक्स हा पुरस्कार मिळाला आहे . तुमच्यातील प्रत्येक जण मोठा शास्त्रज्ञ होईलच असे नाही पण प्रत्येक जण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवू शकतो. आजच्या काळात शेती, औषधे, अंतराळ, संशोधन संगणक, इंटरनेट या सर्व क्षेत्रात विज्ञानामुळे प्रगती झाली आहे म्हणूनच आजच्या या दिनी संकल्प करूया की प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी विज्ञान दिनाचे महत्त्व विज्ञान शिक्षक मिहीर राणे यांनी विद्यार्थ्यांना करून दिले. सूत्रसंचालन नववीची विद्यार्थिनी कुमारी तन्वी पाटील यांनी पाटील केले. आभार प्रदर्शन विद्यार्थिनी सिद्धी पाटील यांनी मानले. यावेळी विज्ञान दिनानिमित्त प्रदर्शन तर मराठी भाषेनिमित्त पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
