मुंबई: राज्यातील मराठी शाळा बंद होणार अशा चर्चावरून सुरू असलेल्या वादावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिले आहे. “विरोधकांकडे ही आकडेवारी येते कुठून?” असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळा बंद होण्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, कुणी म्हणतंय ६५,००० शाळा बंद झाल्या, कुणी म्हणतंय २,००० शाळा बंद होणार. हे आकडे इतक्या आत्मविश्वासाने येतात कुठून? हेच मला समजत नाही. ही सर्व आकडेवारी पूर्णपणे कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारी आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्यात आजही ८४ ते ८५ टक्के शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. केवळ कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समायोजन करण्याचा विचार असतो, पण शाळा ‘बंद’ करण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत मोजक्याच शाळा तांत्रिक कारणांमुळे बंद झाल्या आहेत, पण तो आकडा विरोधक सांगत असलेल्या हजारोंच्या घरात नक्कीच नाही. मोदी सरकारने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणही मराठीत उपलब्ध करून दिले आहे. मग सरकार मराठी शाळा का बंद करेल? असा उलटप्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
