सासवड: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरातून मार्गस्थ होत असताना आज सोमवारी सकाळी वारीला भीषण अपघाताचे ग्रहण लागले. ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिल्याने अपघात घडला असून या भीषण अपघातात ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच १६ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने हॉटेल शिपदीप लॉजिंगच्या समोर हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. दरम्यान, ट्रक चालकाला ताप आल्यामुळे त्याने गोळ्या घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला ग्लानी आली, अशी माहिती मिळत आहे. ट्रॅक्टर ट्रॉली नांदेडची असून मयत महिला वारकरी सांगलीच्या रहिवाशी होत्या.नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबिशीकर यांच्या दिंडीच्या ट्रकला अपघात झाला. अपघातग्रस्तांमध्ये सांगली जिल्ह्यातील कासबेडीगराज येथील दिंडीतील सात महिला वारकऱ्यांचा समावेश आहे. राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे,नंदा पवार या तीन महिला या अपघातात मयत झाल्या आहेत.
