निळजे (प्रतिनिधी) : निळजे गावात रहिवासी इमारतींच्या बांधकामादरम्यान रेल्वे आणि पुलाखालील दोन नैसर्गिक मोऱ्या बंद करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग पूर्णपणे बंद झाला असून, प्रत्येक मुसळधार पावसात गावातील घरं, रस्ते आणि सर्वोदय विद्यालय पूरस्थितीत येत आहे.अनेक वर्षांपासून सुरळीत चालणारा पाण्याचा निचरा नव्या बांधकामांमुळे अडवला गेल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. घरांमध्ये पाणी शिरणे, विद्यार्थ्यांचे शाळेत येणे-जाणे अडचणीचे होणे आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होणे ही समस्या नियमितपणे उद्भवत आहे.ग्रामस्थांनी रेल्वे विभाग, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. रेल्वेखालील व पुलाखालील बंद मोऱ्या व नैसर्गिक नाला त्वरित पूर्ववत सुरू करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.नागरिकांचा इशारा स्पष्ट आहे – “तातडीने उपाययोजना न झाल्यास येत्या पावसाळ्यात मोठी पूरस्थिती निर्माण होऊ शकते आणि जीवित व वित्तहानी टाळणे कठीण होईल.” प्रशासनाने त्वरित पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
