सावंतवाडी, दि. ११ मे (वार्ताहर): शहराच्या सीमेवर सावंतवाडी–बेळगाव राज्य महामार्गालगत असलेल्या नगर परिषदच्या कचरा डेपोला दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले असून काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नगर परिषद प्रशासन, अग्निशमन दल आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.मिळालेल्या माहितीनुसार, डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात सुका कचरा साठवून ठेवण्यात आला होता. दुपारच्या वेळी अचानक आग लागल्याने काही क्षणांतच तिने उग्र रूप धारण केले. आगीमुळे काळा धूर आकाशात पसरल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. धुरामुळे परिसरातील नागरिकांनाही श्वसनाचा त्रास जाणवत असल्याची चर्चा होती.घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे स्वच्छता विभाग, अग्निशमन कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाण्याच्या फवाऱ्यांसह विविध उपाययोजना करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, आग पूर्णपणे विझण्यासाठी काही तास लागले. कचऱ्यात प्लास्टिक, इलेक्ट्रिक साहित्य आणि अन्य ज्वलनशील वस्तू असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती.दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाळा तोंडावर असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा डेपोमध्ये का साठवून ठेवण्यात आला होता, असा सवाल उपस्थित करण्यात आला. काही नागरिकांनी “पावसाळ्यापूर्वी जागा साफ करण्यासाठी जाणूनबुजून आग लावण्यात आली का?” अशी शंकाही व्यक्त केली.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, पुढील काही दिवस हा कचरा धुमसत राहिल्यास महामार्गावरील वाहनधारक तसेच परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो, अशी भीतीही व्यक्त होत आहे.यावेळी स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, अक्षय पंडित, शेखर मेहत्तर, अग्निशमन कर्मचारी नंदू गावकर यांच्यासह नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले असून पुढील उपाययोजनांबाबत नागरिकांचे लक्ष लागले आहे.
previous post
