स्टोरी

कोमसाप चे जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन केशवसुत कट्टा तुतारी जवळ उत्साहात संपन्न……

Spread the love

आपण जी कविता लिहितो त्यामध्ये रिदम आहे का आणि आपण लिहिलेली कविता जे लिहीत नाहीत आणि जे प्रेषक आहेत त्यांच्या मनाला शेवटपर्यंत भिडेल अशी अभ्यास पूर्ण परिपूर्ण कविता लिहायला हवी कविता शेवटपर्यंत रसिक प्रेक्षकांनी ती ऐकायला हवी आणि तीच खरी कविता मनाला भिडते आणि त्यासाठी कवी साहित्यिक अथवा कोणीही असो आपल्यात काय बुद्धिमत्ता इंटेलिजन आहे. हे ओळखून साहित्य अथवा कविता लिहायला हवी असे मत जेष्ठ कवी साहित्यिक जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलनाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील मोती तलावाच्या काठी केशवसुत कट्ट्याजवळ जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन व मराठी भाषा दिन कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे आयोजित करण्यात आला होता. जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन केशवसुत कट्टा तुतारी जवळ मराठी भाषा दिनी सावंतवाडीचा मोती तलाव ची सायंकाळ साहित्य कवी मैफिलीने रंगली. या कवी संमेलनाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून श्री वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष  मंगेश मसके, स्वागताध्यक्ष कोमसापचे .सुभाष गोवेकर, कोमसाप केंद्रीय कार्यकारणी सदस्या साहित्यिका उषा परब, कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी. ए. बुवा, जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम, मराठी अध्यापक संघाचे भरत गावडे, मालवणी कवी रुजारियो पिंटो, कुडाळ  तालुका अध्यक्षा वृंदा कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी कवी संमेलनाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सावंतवाडी कोमसाप  पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानावर बोलताना श्री वैद्य पुढे म्हणाले खरंतर कविता तुम्ही लिहिता ती कशी लिहू नये किंवा कशी लिहावी हे सर्वजण सांगत असतात. परंतु कवितेत काय लिहू नये हे सांगायला हवे यासाठी कविता लिहिण्यापूर्वी ती कविता प्रेक्षक रसिकांना शेवटपर्यंत ऐकायला आवडायला हवी. मनाला भिडायला हवी. अशी अभ्यासपूर्ण आणि वाचनीय कविता असायला हवी. आपल्यात काय इंटेलिजन्स आहे बुद्धिमत्ता आहे हे ओळखायला शिकायला हवे. बुद्धिमत्तेचे ५२ प्रकार आहेत आणि हे ५२ ही प्रकार आपण आत्मसात केले तर निश्चितच आपण यशाची किनारा गाठू शकतो. कवितेत खऱ्या अर्थाने रिदम असायला हवा असे ते म्हणाले. आपण मराठी भाषा आता टिकेल की नाही, इंग्रजी मुळे मराठी भाषा संपेल की काय? अशी भीती व्यक्त करतो. परंतु मराठी भाषेला इंग्रजीची भीती नसून खऱ्या अर्थाने हिंदी भाषाच मराठीला भीतीदायक आहे. आपण वाक्यप्रचारात किंवा कुठेही बाहेर जातो तेव्हा हिंदीचा सर्रास वापर करतो. त्यामुळे भविष्यात मराठीला हिंदी भाषाच मारक ठरू शकते. त्यामुळे मराठी भाषा टिकवायची तर आपण मराठी भाषा नेहमी आत्मसात करायला हवी. असेहि ते म्हणाले. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे वितरित करण्यात आली. ही निबंध स्पर्धा  अमोल टेंबकर यांनी मातोश्रींच्या स्मरणार्थ प्रायोजित केली होती. त्या निबंध स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. या स्पर्धेबाबतची माहिती सहसचिव राजू तावडे यांनी दिली. यावेळी श्री टेमकर यांनी निबंध स्पर्धा दरवर्षी भरवण्यात येईल असे स्पष्ट केले.  सावंतवाडीच्या कविवर्य केशवसुत कट्ट्यावर केशवसुतांच्या ‘तुतारी’ कवितेची आठवण म्हणून बसविलेल्या तुतारीच्या सानिध्यात संपूर्ण मोकळ्या वातावरणात पहिल्यांदाच अशा प्रकारचे कवी संमेलन कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने आयोजित केले होते. या कवी संमेलनात जिल्हाभरातील अनेक कवी कवयित्रीनी सहभाग घेतला होता. तसेच मोठ्या प्रमाणावर रसिक श्रोत्यांची गर्दीही पहायला मिळाली. मालवणचे कवी रुजारियो पिंटो यांच्या ‘ शालग्या’ या मालवणी कवितेने तुतारी कविसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. जिल्हाभरातून कवी संमेलनासाठी उपस्थित असलेल्या कवी-कवयित्रींनी बहारदार अशा कविता सादर करून काव्य संमेलनात रंगत आणली. तुतारी कवी संमेलनात मुक्तछंदापासून मालवणी, वृत्तबद्ध कवितेपर्यंत विविध प्रकारच्या कविता सादर करण्यात आल्या. “अआइईची कास सोडुनी एबीसीडी लिहिली, मायमराठीच्या पायाची भरणी कच्ची झाली’ या कवितेतून कवी दीपक पटेकर यांनी मराठीची व्यथा मांडली. अॅड.नकुल पार्सेकर यांनी ‘कविता तारण’, प्रा. रुपेश पाटील यांनी खांद्यावर वेगवेगळ्या पक्षांचा झेंडा घेऊन फिरणाऱ्या तरुणाची होणारी अवस्था, त्याच्या मरणानंतर मातेला मिळणारे सरकारचे लाख रुपये काय कामाचे? असे विदारक चित्र दर्शविणारी ‘लाख मोलाचा पोरगा’ ही कविता सादर करून श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कुडाळच्या अदिती मसुरकर यांची बालकविता, विठ्ठल कदम, कल्पना बांदेकर, मंगल नाईक-जोशी, ऋतुजा सावंत- भोसले, प्रज्ञा मातोंडकर, उषा परब, रवींद्र ओगले, सोमा राऊळ आसोली, रा. भा. खानोलकर, पिंगुळी, वाय. पी. नाईक, मुकुंद पिळणकर, तसेच आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थी जयराज मरकड, तारामती पद्मपल्ले, वैभव रांजवन यांच्या सामाजिक विषयांवरच्या कविता अनेकांच्या मनाला भावल्या. त्याचप्रमाणे कुडाळ येथून आलेल्या डॉ. मेधा फणसळकर, स्नेहल फणसळकर, सुरेश पवार, वालावलकर, संदेश धुरी, सुधीर धुमे, प्रवीण ठाकूर, यशोधन चव्हाण, रामदास पारकर आदींनी बहारदार काव्यरचना सादर केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमसापच्या कार्यकारणी सदस्या मेघना राऊळ यांनी तर तुतारी काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन कवी विठ्ठल कदम यांनी केले. प्रास्ताविक सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी करताना वर्षभरात विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत ते सर्वांच्या सहकार्यामुळेच, केशवसुत कट्टा येथे सायंकाळच्या कविता मैफिल रंगून एक आगळावेगळा उपक्रम जिल्हा कमिटीच्या मार्फत त्यांच्या मार्गाने घेण्यात आला आहे. खरतर असे विविध उपक्रम साहित्य चळवळ पुढे नेण्याच्या दृष्टीने राबवण्यात येतील असे स्पष्ट केले. स्वागत प्रा सुभाष गोवेकर यांनी केले.  यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी  कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखा अत्यंत उत्तम प्रकारे साहित्य चळवळ पुढे नेण्याचे काम करत आहे. विविध उपक्रम राबवत असून गेल्या वर्षभरात दर्जेदार उपक्रम राबवले आहेत. ते कौतुकास्पद आहे. केंद्रीय कार्यकारणी सदस्या उषा परब  यांनी तुतारी कवी संमेलन केशवसुत कट्ट्यावर आयोजित करून एक आगळावेगळा पायंडा घालून दिला आहे. या कवी संमेलनात जिल्हाभरातून दर्जेदार नवोदित कवी सहभागी झाले आहेत. हे खरंतर या आयोजनाचे यश आहे. असे त्या म्हणाल्या. माजी नगरसेवक संजय पेडणेकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, नंदकुमार गावडे, रक्तदाता संघटनेचे शुभम बिद्रे, श्री बांदेकर, कोमसाप माजी जिल्हाध्यक्ष अॅड. अरुण पणदूरकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, सहसचिव राजू तावडे, विनायक गावस प्रज्ञा मातोंडकर ऋतुजा सावंत भोसले रुपेश पाटील रामदास पारकर एडवोकेट नकुल पार्सेकर, धोंडी मसूरकर, अदिती सामंत, कल्पना बांदेकर श्री कासले, किशोर नांदिवडेकर रत्नाकर कोळंबकर किशोर वालावलकर संजीव पालकर, शंकर प्रभू कोमसाप सावंतवाडी, कुडाळ, मालवण, आदी शाखांचे सदस्य, पदाधिकारी कार्यकर्ते आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कवी संमेलला उपस्थित कवी
दिप प्रज्वलन करतांना कोमसाप शाखेचे पदाधिकारी

फोटोमध्ये सावंतवाडी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे मराठी भाषा दिन आणि जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलनचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन करताना कवी संमेलनाचे अध्यक्ष अनंत वैद्य बाजूला जिल्हा अध्यक्ष मंगेश मस्के, तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट संतोष सावंत, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, स्वागत अध्यक्ष सुभाष गोवेकर, उषा परब, भरत गावडे, राजू तावडे, जी ए बुवा, वाय पी नाईक आधी तर दुसऱ्या फोटोत उपस्थित कवी छाया अनिल भिसे सावंतवाडी .


Spread the love

Related posts

सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये.,.!

news

कळसुलकर हायस्कूलच्या निधी खडपकर चा नृत्य क्षेत्रात जिल्ह्यात डंका…!

news

न्हावेलीत विजेचा खेळखंडोबा…! ग्राहक हैराण 

news

Leave a Comment