स्टोरी

सावंतवाडी शहरातील नागरी समस्या गंभीर; आर्थिक अनियमितता, प्रशासकीय गोंधळात नागरिक वेठीस!

Spread the love

सावंतवाडी: सावंतवाडी शहरामध्ये सध्या नागरी समस्या आणि प्रशासकीय अनास्थेचा डोंगर उभा राहिला असून नागरिक हैराण झाले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात मग्न आहेत, तर दुसरीकडे नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे सांडपाणी, मोकाट जनावरे, रस्त्यांवरील खड्डे, कचऱ्याचे साम्राज्य आणि पाणी बिलांचे प्रश्न अत्यंत गंभीर बनले आहेत. या परिस्थितीत ‘आपल्या समस्या घेऊन दात कोणाकडे मागावी?’ असा उद्विग्न प्रश्न सावंतवाडीकर विचारत आहेत.

१. आर्थिक अनियमितता आरोप आणि कर्मचाऱ्याला मिळालेली ‘क्लीन चिट’? गेले काही दिवस सावंतवाडी नगर परिषदेची मासिक सर्वसाधारण सभा पाणीपुरवठा दुरुस्तीच्या सामानावरील खर्चाच्या अनियमिततेवरून गाजत आहे. सामान नोंदवही गहाळ झाल्याप्रकरणी वर्ग-३ च्या एका कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व एका कर्मचाऱ्यास अटक झाली.परंतु, ज्या कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली, त्यानेच माजी पाणीपुरवठा सभापती, नगरसेवक व नगरसेविकेसमक्ष साहित्य पुरवठादाराकडून ऑडिटसाठी १.५ लाख रुपये आणल्याचे व १.५ लाख रुपये स्वतः दिल्याचे मान्य केले होते. या आर्थिक अनियमिततेची एसआयटी (SIT) चौकशी व्हावी, म्हणून नगरसेवकांनी मा. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी केली आहे.एकीकडे चौकशीची मागणी होत असताना, दुसरीकडे साहित्य पुरवठादाराकडून पैसे आणणाऱ्या त्याच कर्मचाऱ्याला पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य लिपिक पदाचा पदभार सांभाळण्याचे आदेश दिले गेले आहेत. “याला क्लीन चिट म्हणायचे की भ्रष्टाचाराला दिलेले प्रोत्साहनपर बक्षीस?” असा संतप्त सवाल सावंतवाडीतील नागरिक विचारत आहेत.

२. मालमत्ता करातील सूटीबाबत संभ्रमपाणीपुरवठा साहित्यातील घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच कर विभागाने शहरातील मालमत्ता कराची बिलांचे वाटप सुरू केले आहे. सन २०२५-२६ च्या जुन्या देयकांमध्ये “देयक मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत मालमत्ता कर भरल्यास नगर परिषद कायद्यातील कलम १५० (३) अन्वये सूट देण्यात येईल” अशी तरतूद करण्यात आली होती.मात्र, या नियमात अचानक काही बदल झाला आहे का? प्रशासनाने ही बाब कौन्सिलच्या सभेत निदर्शनास आणली आहे का किंवा बैठकीत जाहीर केली आहे का? याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देऊन नागरिकांना अवगत करावे, अशी मागणी मालमत्ता धारकांमधून होत आहे.

३. लोकप्रतिनिधींचे ‘मौन व्रत’ आणि प्रशासकीय दिरंगाईपाणीपुरवठा साहित्यातील या आर्थिक अनियमिततेबाबत नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते सातत्याने आवाज उठवत आहेत. मात्र, हा आवाज प्रमुख लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाही की त्यांनी सोयीस्कर ‘मौन व्रत’ धारण केले आहे, असा संशय नागरिकांना येत आहे.जिल्हा प्रशासनाला नागरिकांनी अनेक निवेदने देऊनही प्रतिसाद मिळत नसून, येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याचा उघडपणे भंग केला जात आहे. तसेच, “दोन दिवसांत कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळतील” असे आश्वासन देऊन सहा महिने उलटले, तरीही अजून औटघटकेच्या मुख्याधिकाऱ्यांवरच कारभार हाकला जात आहे.

४. मळयुक्त सांडपाणी आणि मोती तलावाची दुरवस्थाशहरातील व्यापारी व निवासी संकुलांच्या सेप्टिक टॅंकमधील सांडपाणी थेट सार्वजनिक गटारांमध्ये व नाल्यांमध्ये सोडले जात आहे. हे दूषित पाणी थेट ऐतिहासिक मोती तलावात मिसळत असल्याने तलावाचा रंग हिरवा पडला असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे.

५. खड्डेमय रस्ते, कचरा आणि पाणी बिलांचा गोंधळरस्त्यांची दुरवस्था: गॅस कंपनी व पाणीपुरवठा ठेकेदारांनी उकरलेल्या रस्त्यांवर भर पावसात खडी टाकण्यात आली. आता ही खडी पसरून रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. खड्ड्यांत मुरूम भरून केलेली मलमपट्टी दोन दिवसांत उघडी पडत आहे.कचऱ्याचे साम्राज्य: आरोग्य विभागात कायमस्वरूपी व ठेकेदारी कर्मचारी असतानाही नगर परिषदेच्या मुख्य गेटसमोरील रिक्षा थांब्यावर आणि थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोरच कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात.पाणी देयकांचा गोंधळ: पाणीपुरवठा साहित्यातील गोंधळामुळे संगणकीय प्रणालीत बिघाड झाला असून, गेल्या चार महिन्यांपासून ग्राहकांना पाणी बिलेच मिळालेली नाहीत.

६. पाळणेकोंड धरणातील पाण्याचा अपव्ययसावंतवाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणातून रोज लाखो लिटर पाणी ओसंडून वाहून जात आहे. या पाण्यावर बंधारा बांधून पाइपद्वारे कुणकेरी गावातील शेती व बागायतीला पाणी देता येऊ शकते. तसेच हे पाणी शुद्ध करून कुणकेरी, कोळगाव आणि सावंतवाडी शहराला दिल्यास पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा सुटू शकतो.

७. प्रशासनात शैक्षणिक पात्रतेचा तीव्र अभावप्रशासकीय विभागात पदांनुसार शैक्षणिक पात्रतेचा प्रचंड अभाव दिसून येत आहे:विद्युत विभाग: वायरमनची पात्रता असलेल्या कर्मचाऱ्याकडे विद्युत निरीक्षकाचा कार्यभार सोपवला आहे.पाणीपुरवठा व आरोग्य विभाग: स्थापत्य अभियंत्याऐवजी अन्य पात्रता असलेल्या कर्मचाऱ्याकडे पाणीपुरवठा निरीक्षकाचा कार्यभार आहे. मजूर हे पंपचालकाचे काम करत आहेत, तर वर्ग-४ चे कर्मचारी लिपिक व पाणीपट्टीचे काम सांभाळत आहेत. आरोग्य विभागात वर्ग-४ चे कामगार खुर्चीत बसून मोबाईल पाहत नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत.

एक दिलासादायक बाब!

या सर्व प्रशासकीय गोंधळ आणि नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी एक अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे — सावंतवाडी नगरपरिषद दवाखान्याला कायमस्वरूपी १ वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) आणि २ सहाय्यक कर्मचारी नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पंचक्रोशीतील गरिबांसाठी वरदान ठरलेल्या या दवाखान्यात आता आरोग्य सेवा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.


Spread the love

Related posts

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त. सावंतवाडी येथील सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाला बेडशीट भेट.

news

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे पुण्यतिथी सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात साजरा

news

वेल्हे तालुक्याचे नामांतर ‘राजगड’ तालुका असे करावे! अजित पवार

news

Leave a Comment