खालापूर | जितिन शेट्टी: महाराष्ट्रातील पंढरपूर येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. खोपोलीच्या क्षितिजा पूजा जगदीश मरागजे हिने प्रतिस्पर्धी कुस्तीपटूला १०-० अशा फरकाने पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे, राज्यस्तरीय स्पर्धेत तिचे हे चौथे सुवर्णपदक ठरले आहे.क्षितिजा ही खोपोली येथील पूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे. नियमित सराव, जिद्द आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले. ती कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत आहे.रायगडच्या शिरपेचात आणखी दोन मानाचे तुरे!याच स्पर्धेत प्रणाली घनवट हिने रौप्यपदक, तर ऋतुजा रुपनवर हिने कांस्यपदक पटकावत रायगडच्या पदकतालिकेत भर घातली. त्यामुळे जिल्ह्याला एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदके मिळाली.क्षितिजाच्या चौथ्या सुवर्णपदकासह तिन्ही खेळाडूंच्या यशाबद्दल रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, कुस्ती संघाचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.मात्र, या यशाचा खरा गौरव म्हणजे केवळ पदकांची संख्या नव्हे, तर कठोर मेहनत, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर राज्यस्तरावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या या खेळाडूंची जिद्द आहे. रायगडच्या या कुस्तीपटूंच्या यशामुळे खोपोलीसह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील वाटचालीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
