वेंगुर्ला वार्ताहर: वेंगुर्ले तालुक्यातील एका गावातील एका कुटुंबात घरात भानामती होत आहे आणि आपल्या अभाअनिसमितीने याचा शोध घ्यावा आणि आम्हा कुटूंबातील व्यक्तीना एका अनामिक भिती पासून मुक्त करावे असा त्या कुटुंब प्रमुखाचा फोन उपाध्यक्ष श्री . संजिव लिंगवत यांना आला. त्यांनी लागलीच जिल्हा संघटक विजय चौकेकर यांना याबाबतची माहिती दिली.तसेच त्यांचा फोन नंबरही दिला. कुटुंब प्रमुखाचा फोन नंबर मिळताच विजय चौकेकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यां भानामती बाबत सविस्तर माहिती घेतली.तसेच त्यांना भानामती कशी होते याची सविस्तर माहिती दिली.जर तुमच्या घरातील वस्तू इतरत्र जातात,घरातील वस्तूंना आग लागते तर हे तुमच्या घरातीलच कोणी करीत आहे.तसेच जर बाहेरून तुमच्या घरावर दगड पडत असतील अथवा काही वस्तू वाटेवर ठेवल्या जात असतील तर सदरचे कृत्य कुणीतरी बाहेरून करतो हे सिद्ध होते.आणि तुमच्या घरातील व्यक्तींच्या अंगावरील कपडे फाटत असतील शरीरावर जखमा अथवा नाक, कान, डोळे यामधून तांदूळ अथवा छोटे दगड येत असतील तर ती व्यक्तीच करते अन्य कोणी नाही. या व्यतिरिक्त कोणतीही अशुभ शक्ती भानामती करू शकत नाही. त्यामुळे आपण घाबरून न जाता या दृष्टीने विचार करावा असे सांगितले.
तरीही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अँड राजीव बिले, सचिव अजित कानशिडे, महिला सहसंघटिका उज्वला येळावीकर आणि विलास चेंदवणकर, संजिव लिंगवत यांना घेऊन विजय चौकेकर त्यांच्या घरी पोहोचले.घरातील सर्वच भिंतीवर काहीही उलघडा होणार नाही अशी शब्द रचना,वाक्य, शाब्दिक कोडे विविध चित्रे काढण्यात आली होती .कुटुंबातील सर्वांचाच सहा वर्षाच्या मुलीवरच संशय होता.वीस वर्षापूर्वी त्यांच्या आतेचा मृत्यू झाला होता व तीचा आत्मा या मुलीच्या शरीरात येतो आणि तिच्याकडून तो आत्मा हे सगळे करून घेतो.कोणाला ही अद्याप भिंतीवर लिहिताना दिसली नाही मात्र तीच हे करते असे सर्वांचेच मत होते. मात्र चित्र पाहता आणि लिखाण पाहता या घरातून निघून जावे, येथे सुख मिळणार नाही. असाच संदेश दिला होता.भिंतीवरील शब्द व वाक्य त्या मुलीकडून वाचून घेण्यात आले, मात्र तिला जोड शब्द वाचता येईनात . तसेच भिंतीवरील अक्षर आणि मुलीचे अक्षर यात तफावत होती. भिंतीच्या छप्परापर्यंत लिखाण केले गेले असल्याने ती सहा वर्षाची मुलगी लिहिणे शक्य नसल्याचे लक्षात येताच घरातील अन्य व्यक्तीच हे सर्व करीत असल्याची खात्री झाली. देवाऱ्यातील फोटो जळणे, भिंतीवरील शर्ट जळणे, कपड्यांच्या पिशवीला आग लागणे, सामानाची पिशवी लाकडाच्या माचाखाली जाऊन पेटणे, तांदूळाची गोणीने पेट घेणे अशा प्रकारच्या घटना या मानवी कृती असल्याचे लक्षात येतात अँड राजीव बिले यांनी सर्वांनाच एकत्र करून तुमच्यापैकीच कोणीतरी हे करीत आहे, त्यामुळे खरे बोलावे अन्यथा पोलिस कार्यवाही करावी लागणार असे सांगितले.त्या दिवशी जेथे भानामती होत होती तेथे कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात.त्याप्रमाणे कॅमेरे बसवून पुन्हा तिसऱ्या दिवशी सर्व टिम तेथे पोहोचली.कॅमेरे बसविले हे लक्षात आल्याने तीन दिवसात कोणतीही भानामती झाली नाही. मात्र भानामती कोण करतो हे सिद्ध न झाल्याने सर्वांच्या स्वतंत्र मुलाखती घेण्यात आल्या .यातून जाणवले की कुटुंबांतीत व्यक्ती व्यक्तीमधील हरवलेला संवाद. आईला मुलाकडून तसेच आपल्या पतीकडून मानसन्मान हवा असतो तर घरातील सुनेला आपल्या नवऱ्याकडून, सासू, सासरे यांचेकडून सन्मानाने, प्रेमाने, आपुलकीने वागणूकीची अपेक्षा असते.कुटुंबातील अशा एखाद्या व्यक्तीला जर तीच्याअपेक्षेप्रमाणे वागणूक मिळत नसेल तर तीचा भावानिक कोंडमारा होतो आणि अशी व्यक्ती टोकाचे पाऊल् उचलते जेणे करून आपल्याला सन्मानाची वागणूक मिळावी अशी अपेक्षा असते.स्वतंत्र घेतलेल्या मुलाखती मधून या गोष्टी सिद्ध झाल्यावर पुन्हा असे वर्तन न करण्याची त्या व्यक्तीला समज देण्यात आली आणि आपले नाव कुणालाही सांगणार नाही या अटीवर भानामती थांबली .कुटुंबात संवाद साधला जावा, एकमेकांचा मानसन्मान जपला जावा,नात्यातील कर्तव्य सर्वांनी पार पाडल्यास अशा भानामती, करणी सारख्या घटना घडणार नाहीत असे जिल्हा संघटक विजय चौकेकर अणि अध्यक्ष राजीव बिले यांनी सांगितले . शेवटी सर्वांना एकत्र करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले . मंत्रशंक्तीने अथवा दिव्य शक्तीने कोणीही भानामती करू शकत नाही या साठी अभाअंनिसमितीचे आज अखेर ऐशी लाखाचे आवाहन अजून पर्यंत कोणीही स्विकारलेले नाही.त्यामुळे अशा घटनांना भानामती अथवा करणी समजू नये असे आवाहन करण्यात आले .
