सावंतवाडी: नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील ‘वस्तू नोंद’ आणि ‘वापर रजिस्टर’ गहाळ करून त्यांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी नगरपरिषदेतील कर्मचारी भारत बाबू लाखे यांच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियमासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये ही कारवाई करण्यात आल्याने नगरपरिषद वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकारदि १९ ऑगस्ट सायंकाळी ५.१५ ते २० ऑगस्ट दुपारी १२.४५ या कालावधीत घडला. कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी रजेवर असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयातील ही दोन महत्त्वाची रजिस्टर्स हाताळली. त्यातील नोंदी नष्ट करण्याच्या किंवा कोणाला दिसू नयेत या उद्देशाने ती एका पिशवीत ठेवून त्यांची विल्हेवाट लावल्याचा आरोप आरोपीवर करण्यात आला आहे.याप्रकरणी सावंतवाडी नगरपरिषदेचे अधिकारी संजय गोविंद पोईपकर (वय ५१, रा. वझरवाडी, सावंतवाडी) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी भारत बाबू लाखे (वय ५६, पद-जोडारी, रा. लाखेवस्ती, सावंतवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २४८/२०२६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २३८ (ब), २४२ तसेच महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ चे कलम ८ व ९ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी रात्री ९.५३ वाजता या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली.सध्या आरोपीच्या अटकेबाबत पोलीस तजवीज करत असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे हे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
