सावंतवाडी(दीपक पटेकर): सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत असून, वाढत्या महागाईवर मात करत सावंतवाडीकरांनी सालाबादाप्रमाणे दीड दिवसांच्या गणरायाला अश्रूपूर्ण नयनांनी आणि शिस्तबद्ध वातावरणात निरोप दिला. “गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या” च्या गजराने आणि ढोल-ताशांच्या तालावर संपूर्ण मोती तलाव परिसर दुमदुमून गेला होता.
मोती तलावाच्या घाटावर गणेशभक्तांची गर्दी..! गुरुवारी सायंकाळपासूनच शहरातील घरगुती दीड दिवसांच्या श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली होती. मोती तलावातील ‘श्रीराम वाचन मंदिर’ समोरील घाट आणि ‘जगन्नाथराव भोसले उद्यान’ समोरील घाटावर विसर्जनासाठी भक्तांची मोठी गर्दी जमली होती. रात्री ९ वाजेनंतर विसर्जनाचा वेग वाढला. फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरामुळे लहान-थोर, महिला व तरुण गणेशभक्तांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. नगरपरिषदेची चोख विसर्जन व्यवस्था*विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने मोती तलावाच्या सर्व घाटांवर उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. पालिका कर्मचाऱ्यांनी बोटींच्या साहाय्याने तलावात खोलवर जाऊन गणेशमूर्तींचे सुरक्षित आणि व्यवस्थित विसर्जन केले. नगरपरिषदेच्या या चोख नियोजनामुळे गणेशभक्तांनी समाधान व्यक्त केले.
