सावंतवाडी (कलंबिस्त): रोटरी क्लब सावंतवाडी यांचे वतीने कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तमध्ये वाचनसंस्कृती वृद्धींगत करण्यासाठी ‘वाचू आनंदे’ हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रोटरीयन प्रवीण परब, माजी अध्यक्ष रोटरीयन दिलीप म्हापसेकर व प्रमुख वक्ते महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य, नवीन शैक्षणिक धोरण सुकाणू समिती सदस्य तथा दाणोली वाचनालयाचे अध्यक्ष श्री.भरत गावडे सर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अभिजीत जाधव आदी उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक जाधव सर यांनी उपस्थितांचे स्वागत करून रोटरी क्लबच्या समाजाभिमुख कार्याला शुभेच्छा दिल्या.रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण परब यांनी रोटरी क्लबच्या उपक्रमांचा आढावा घेत ‘वाचू आनंदें या कार्यक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी व वाचन संस्कृतीला बळकटी देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत असे सांगितले. यानंतर प्रमुख वक्ते श्री.भरत गावडे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व,वाचनाची सवय, नवीन बदलता अभ्यासक्रम, बोली भाषा तसेच उपयोजित लेखनासंदर्भात सखोल व विस्तृत मार्गदर्शन केले. कथा, कविता व विविध संदर्भ देऊन त्यांनी मराठी साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना करुन दिली.
वाचनाच्या व्यासंगातून आपली भाषिक कौशल्ये विकसित करुन विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा असे त्यांनी आवाहन केले. यावेळी रोटरीयन दिलीप म्हापसेकर यांनीही विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. यावेळी प्रशालेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले तर आभार विलास चव्हाण यांनी मानले.
