सावंतवाडी(संतोष परब): गोव्यात डंपरवर झालेल्या कारवाईच्या कारणावरून बांदा एसटी स्टँडजवळील उड्डाणपुलाखाली ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि डंपर चालकांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना रविवारी (1 नोव्हेंबर) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत लोखंडी पाईपने वार केल्याने दोघांना दुखापत झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडाळ एमआयडीसी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक उमेश अनंत दळवी (37) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डंपर अडविल्याच्या कारणावरून अनिकेत बांदिवडेकर (26, रा. निरवडे, सावंतवाडी) व त्याच्या अन्य पाच मित्रांनी दळवी यांना अश्लील शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देत अनिकेत याने लोखंडी पाईपने दळवी यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस वार करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे. या तक्रारीवरून अनिकेत व त्याच्या पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, डंपर चालक अनिकेत बांदिवडेकर यांनीही परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. गोव्यात डंपरवर झालेल्या कारवाईबाबत कोणाच्या सांगण्यावरून कारवाई झाली, याची विचारपूस करत असताना उमेश दळवी यांनी आपण कुडाळ असोसिएशनचे सदस्य असल्याचे सांगत तेथे थांबण्यास विरोध केला व शिवीगाळ केली. त्यानंतर दळवी यांनी गाडीतील लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा आरोप अनिकेत यांनी केला आहे. तसेच नितीन शिरसाठ व ओमकार वालावलकर (दोघेही रा. कुडाळ) यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.या तक्रारीवरून उमेश दळवी, नितीन शिरसाठ आणि ओमकार वालावलकर या तिघांविरोधात बांदा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. दोन्ही परस्परविरोधी गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नाईक करीत आहेत.
