सावंतवाडी – दि. २ सप्टेंबर (वार्ता ): हिंदू सण-उत्सवांतील ‘महाप्रसाद’, ‘भंडारा’ व ‘अन्नदान’ या उपक्रमांवर अन्नसुरक्षेच्या नावाखाली एकतर्फी कारवाई केली जाऊ नये. सर्व धर्मीय सण-उत्सवांमध्ये अन्नवितरणासाठी समान नियम लागू करण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन मंदिर महासंघाच्या वतीने येथील नायब तहसीलदार श्रीम. सविता तारी यांच्या जवळ मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य; मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य; मा. श्री. नरहरी सीताराम झिरवाळ, मंत्री, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य; मा. श्री. योगेश कदम, राज्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य; मा. श्री. संजय खंडारे, अपर मुख्य सचिव, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य; तसेच मा. श्री. तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांना देण्यासाठी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षेबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळणे आवश्यक असले तरी केवळ हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या ‘महाप्रसाद’, ‘भंडारा’ आणि ‘अन्नदान’ यांचा विशेष उल्लेख करून तपासणी अथवा कारवाईचा इशारा देणे ही भूमिका पक्षपाती असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अन्नसुरक्षेचे नियम आवश्यक असल्यास ते कोणताही धर्म, पंथ किंवा सण यांचा भेद न करता सर्वांसाठी समानपणे लागू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाप्रमाणेच अन्य धर्मीय सणांमधील सार्वजनिक अन्नवितरण व भोजनालयांनाही समान अन्नसुरक्षा नियम लागू आहेत का, याविषयी शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी. तसेच मागील तीन वर्षांत FDA कडून विविध धार्मिक सणांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सार्वजनिक करावा, महाप्रसाद व भंडारा यांना अनावश्यक प्रशासकीय बंधनांपासून मुक्त ठेवावे, तसेच मंदिर, धार्मिक स्थळे, शासकीय रुग्णालये व शासकीय कँटीनमधील अन्नाच्या गुणवत्तेची समान निकषांवर तपासणी करावी, अन्नसुरक्षेच्या नियमांना विरोध नसून त्यांची निवडक पद्धतीने अंमलबजावणी होऊ नये, ही भूमिका असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
“अन्नसुरक्षेचे नियम सर्वांसाठी समान” या तत्त्वानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी सर्वश्री शिवराम देसाई, एकनाथ सावंत, दिलीप आठलेकर, चंद्रकांत बिले, योगेश सोमण, संपद दळवी, विष्णू गवस, दत्ताराम राऊळ, मनीष परब, सागर गावडे विश्राम सावंत, परेश तेजम अधिवक्ता राजू कासकर, कृष्णा धुळपणावार (बजरंग दल, गोरक्षक ) आदी उपस्थित होते.
