Uncategorizedस्टोरी

मराठी सिनेसृष्टीतील “फौजदार” हरपला; रविंद्र महाजनी यांचे निधन

Spread the love

१५ जुलै, पुणे वार्ता: आपल्या तडफदार आणि रुबाबदार रुपाने मराठी मनोरंजन सृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ‘चॉकलेट बॉय’ अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. महाजनी काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. सध्या ते पुण्यातील तळेगाव-दाभाडे परिसरात भाड्याने राहत होते. त्यांच्या घरातून कुजलेला वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घराचे दार तोडून प्रवेश केला असता ते मृतावस्थेत आढळले. दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हँडसम फौजदार अभिनेता आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील विनोद खन्ना अशी रविंद्र महाजनी यांची ओळख होती. बेळगावात हे त्यांचे जन्म ठिकाण. त्यांनी नोकरी करण्यासाठी मुंबई गाठली. रविंद्र महाजनी यांना अभिनयाची गोडी शिक्षणादरम्यानच लागली होती. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रविंद्र महाजनी यांनी सिनेसृष्टीत नशीब आजमावायला सुरुवात केली. रविंद्र महाजनी यांनी ‘जाणता अ जाणता’ या मराठी नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. मिळालेल्या पहिल्या संधीचं रविंद्र महाजनी यांनी सोनं केलं. त्यांची पहिलीच भूमिका खूप गाजली. पुढे ‘तो राजहंस एक’ हे त्यांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक रंगभूमीवर आलं. शांतारामबापूंनी या नाटकाचा प्रयोग पाहिला आणि आपल्या ‘झुंड’ या सिनेमासाठी त्यांना विचारणा केली. 1974 मध्ये आलेल्या या सिनेमाने रविंद्र महाजनी यांना सुपरस्टार केलं. रविंद्र महाजनी यांचा ‘झुंड’ हा पहिलाच सिनेमा खूप गाजला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पहिल्या सिनेमाच्या यशानंतर महाजनींकडे सिने-निर्मात्यांची रांग लागली. ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’,’ देवता’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, असे रविंद्र महाजनी यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. तसेच ‘सत्तेसाठी काहीही’ या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा रविंद्र महाजनी यांनी सांभाळली आहे.

सत्तरच्या दशकातला ‘चॉकलेट बॉय’ म्हणून रविंद्र महाजनी ओळखले जायचे. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवण्यासह त्यांनी हिंदी आणि गुजराती सिनेमांतही काम केलं. रविंद्र महाजनी यांची खरी ओळख सिनेमांचा प्रवाह बदलायला लावणारा कलाकार अशी आहे. मराठी सिनेसृष्टीतला ‘हँडसम हंक’ गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा रविंद्र महाजनी यांचा मुलगा आहे. रविंद्र आणि गश्मीर यांनी ‘पानिपत’ आणि ‘देऊळ बंद’ या सिनेमांत एकत्र काम केलं आहे. रवींद्र महाजनी यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगा गश्मीर महाजनी देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांची मुलगी आजवर कधी समोर आलेली नाही. रवींद्र महाजनी हे मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. अभिनय क्षेत्रात काम करत असताना ते टॅक्सी चालक म्हणून काम करत होते. मुंबईत जवळपास 3 वर्षाहून अधिक ते टॅक्सी चालक म्हणून काम करत होते. मराठीतील राजेश खन्ना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या रवींद्र महाजनी यांनी एकेकाळी फसवणूक, कर्ज अशा संकंटांचा सामना केला आहे.


Spread the love

Related posts

माळगाव येथे २६ रोजी दत्त जयंती उत्सव…!

news

अत्याधुनिक दर्जाच्या ‘एके-२०३’ रायफली भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल.

news

मालवण येथे २६ मे पासून प्रवासी जल वाहतुकीबरोबरच विविध जलक्रीडा बंद राहणार!

news

Leave a Comment