सावंतवाडी* दि. ७ ऑक्टोबर (संतोष परब): सावंतवाडी नगरपरिषदेच्या कारभारावर आणि इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गैरव्यवहारांवर आक्रमक भूमिका घेत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी पत्रकार परिषदेत नगरपरिषदेच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. “नगरपरिषदेत सध्या पोरखेळ सुरू असून प्रशासनाचा आणि सत्ताधाऱ्यांचा पूर्णपणे बाजार झाला आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी या वेळी केला.पत्रकार परिषदेस नगरसेविका अॅड. नीता सावंत-कविटकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक आणि नगरसेवक देव्या सुर्याजी आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे: अनधिकृत गाळे ताब्यात घेण्याची मागणी : इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील २० गाळेधारकांनी परस्पर भिंती काढून आणि बेकायदेशीरपणे पोटभाडेकरू ठेवून प्रतिमास २० सहस्र रुपये भाडे लाटले आहे, तर नगरपरिषदेला अवघे दीड हजार रुपये मिळत आहेत. गेल्या २५ वर्षांत केवळ दंड वसूल करून गप्प बसण्याऐवजी प्रशासनाने हे गाळे ताब्यात घेऊन बेरोजगार तरुणांना द्यावेत.
सत्ताधाऱ्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह: उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर हे अभ्यासू असतानाही या विषयावर का गप्प आहेत? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का? असा प्रश्न करत सत्ताधाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर त्या भिंती तातडीने बांधून घ्याव्यात, असे आव्हान परब यांनी दिले.पाणी पुरवठा सभापतींची ‘क्लिनचिट’ अयोग्य : चौकशी समिती नेमलेली असताना सभापतींना सभागृहातून परस्पर ‘क्लिनचिट’ देणे चुकीचे आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सभापतींचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
निविदेविना खड्डे भरून भ्रष्टाचार : मुख्य रस्त्यावरील खड्डे कोणत्याही टेंडर प्रक्रियेशिवाय भरण्यात आले आहेत. १ लाखाचे बिल २ लाख दाखवून भ्रष्टाचाराचा नवीन प्रकार सुरू असून नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी अशी मनमानी कामे करू नयेत, असा इशारा त्यांनी दिला.मोती तलावाची दुर्दशा : सावंतवाडीचे हृदय असलेल्या मोती तलावाच्या कामावर असंतोष व्यक्त करत तलावाला ‘कॅन्सर’ झाल्यासारखी स्थिती झाली आहे. या समस्येचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधणार असल्याचे परब यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून मागणीकडे दुर्लक्ष – अॅड. नीता सावंत
चौकशी समितीत मुख्याधिकाऱ्यांना ठेवू नये, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती; मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आता याप्रकरणी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणार असल्याचे नगरसेविका अॅड. नीता सावंत-कविटकर यांनी स्पष्ट केले.मंत्री उदय सामंत यांचे मानले आभारबांदा शहरातून जाणारी ३३ केव्हीची वीज लाईन धोक्याची असल्याने ३ किलोमीटरची लाईन भूमिगत (अंडरग्राउंड) करण्यास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मान्यता दिली, त्याबद्दल संजू परब यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
