ओरस: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC Bank), नाबार्ड आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था यांच्या वतीने ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत सहभागी होत मच्छीमार बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, मोठे व्यावसायिक प्रकल्प, मत्स्यबीज निर्मिती, हॅचरी आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीवर भर देण्याचे आवाहन केले. आंध्र प्रदेशचे वार्षिक मत्स्य उत्पादन सुमारे ५५.३९ लाख टन, तर महाराष्ट्राचे उत्पादन सुमारे ७.३५ लाख टन आहे. ही मोठी तफावत दूर करून महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसायाला नवी झेप देण्यासाठी आंध्र प्रदेश दौरा करून तेथील यशस्वी मत्स्य व्यवसाय मॉडेलचा अभ्यास केला.महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला देशातील अग्रगण्य राज्यांच्या पंक्तीत आणण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाचे बजेट २१२ कोटी रुपयांवरून १,२४० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले असून, २०२९ पर्यंत हे बजेट ५ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. मच्छीमारांना कृषी क्षेत्राच्या धर्तीवर प्रोत्साहन देण्यासोबतच मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मत्स्य व्यवसायासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.

तसेच, सिंधुदुर्गातील वेंगुर्ला-उभादांडा येथे बहुप्रजाती मत्स्यबीज केंद्र उभारण्यात येत असून, पुढील १२ महिन्यांत ते कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.सरकार, सहकारी बँका आणि नाबार्ड मच्छीमारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आता मच्छीमार बांधवांनीही आधुनिक प्रकल्प उभारण्यासाठी, नव्या संधी स्वीकारण्यासाठी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. महाराष्ट्रातील मच्छीमार आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध व्हावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास यावेळी व्यक्त केला.कार्यशाळेला MSC बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, MSC बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे, CGM अशोक माने, नाबार्डचे CGM डॉ. ए. व्ही. भवानी शंकर, DDM अविनाश तिवारी, AGM पियुष, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक व मान्यवर उपस्थित होते. तसेच मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्यासह बँकिंग व सहकार क्षेत्रातील अधिकारी आणि प्रतिनिधींचाही सहभाग होता.
