सावंतवाडी ( संतोष परब): शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गासंदर्भात स्थानिक नागरिक, शेतकरी व संबंधित जमीनधारकांच्या हरकती, सूचना आणि मते जाणून घेण्यासाठी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झोळंबे, असनिये आणि बांदा येथे या जनसुनावणी होणार असून, संबंधित गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली भूमिका मांडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.*२९ सप्टेंबर या दिवशी दोन ठिकाणी सुनावणी*झोळंबे येथे दि.२९ सप्टेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता जनसुनावणी होणार आहे. ही सुनावणी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, झोळबे येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच याच दिवशी सकाळी ११ वाजता असनिये येथे जनसुनावणी होणार आहे. असनिये येथील सुनावणीचे स्थळही जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा असे आहे.
या दोन्ही सुनावण्यांमध्ये प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या जमिनी, शेती, घरे, स्थानिक रस्ते, पाण्याचे स्रोत, पर्यावरण तसेच ग्रामस्थांच्या अन्य बाबींविषयी नागरिकांना आपली मते व हरकती मांडता येणार आहेत.*दि.३० सप्टेंबर या दिवशी बांद्यात जनसुनावणी*बांदा शहरासाठी दि.३० सप्टेंबर दुपारी ३.३० वाजता जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही सुनावणी खेमराज हायस्कूल सभागृह, बांदा येथे होणार आहे. बांदा व परिसरातील प्रस्तावित मार्गामुळे प्रभावित होणारे शेतकरी, जमीनधारक, ग्रामस्थ तसेच संबंधित नागरिकांनी या सुनावणीला उपस्थित राहून आपली मते व हरकती अधिकृतपणे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गामुळे सिंधुदुर्गातील विविध गावांमधील जमीनधारकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनसुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नागरिकांनी आपल्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे, हरकती, सूचना आणि अन्य आवश्यक माहिती घेऊन उपस्थित राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जनसुनावणीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांची मते प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळणार असल्याने संबंधित गावांमध्ये या सुनावणीविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
