सोलापूर: पंढरपुरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ७० वर्षीय वृद्ध महिलेने आपल्या प्रियकरालाच एका क्षुल्लक वादावरुन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे वृद्धाच्या हत्येनंतर तब्बल दीड महिन्यांनी या घटनेचा खुलासा झाला आहे. मृतक वृद्धाचा डीएनए रिपोर्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी वृद्ध महिलेला ताब्यात घेत तिची चौकशी केली. तिची कसून चौकशी केली असता महिलेने आपला गुन्हा कबूल केला. संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबादास आणि मंगल यांच्यात काहीतरी एका कारणावरुन वाद झाला. हा वाद वाढत गेला आणि थेट हिंसाचारापर्यंत जावून पोहचला. हा वाद २७ जुलैला घडला होता. या वादात वृद्ध महिला असलेल्या मंगलने प्रियकर असलेल्या अंबादास यांची शेतात हत्या केली. ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने अंबादास यांच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यासाठी तिने अंबादास यांचा मृतदेह जाळून टाकला आणि तिथून पळून गेली. या घटनेनंतर २ ऑगस्टला काही गावकऱ्यांना शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटणे अशक्यच होतं. त्यामुळे फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचरण करण्यात आलं. तसेच मृतदेह डीएनए चाचणीसाठी पाठववण्यात आले.
घटनेनंतर तब्बल दीड महिन्यांनी मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्या अनुषंगाने तपासाला सुरुवात केली. दीड महिन्यात केलेल्या तपासाच्या आधारावर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि अवघ्या १२ तासांत मंगल होनमाने या वृद्ध महिलेला ताब्यात घेतलं. पोलिसांनी मंगल होनमाने हिची कसून चौकशी केली. यावेळी मंगलने आपणच अंबादास यांना संपवल्याचं कबूल केलं. प्रेम प्रकरणात झालेल्या भांडणाच्या रागातून आपण ही हत्या केल्याचं मंगलने कबूल केलं. या घटनेचा पुढील तपास पंढरपूर पोलीस करत आहेत. पण संबंधित प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
