सावंतवाडी: ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग आणि सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, शिरशिंगे – वीरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरशिंगे वीरवाडी येथे रक्तदान शिबीर फार मोठ्या उत्साहात संपन्न झाले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक ( दयानंद गवस आणि कलंबिस्त पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. उद्घाटनप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस यांनी सांगितले की, रक्तदान हेच खरे जीवनदान असून यासारखे दुसरे श्रेष्ठ दान नाही. आजच्या युवा पिढीने नवरात्र उत्सवासारख्या धार्मिक सणाचे औचित्य साधून अशा सामाजिक उपक्रमाचे आयोजन करणे, ही त्यांच्या समाजाप्रती असलेल्या आत्मीयतेची साक्ष आहे. युवा पिढी अशा प्रकारे सामाजिक भान जपत असल्याचे पाहून मनस्वी आनंद होत असल्याचे सांगत त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे तोंडभरून कौतुक केले. तर पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत यांनी आपल्या मनोगतातून मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. समाजाला दिशा देणाऱ्या अशा उपक्रमांना आपले सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच नारायण राऊळ, माडखोल येथील सामाजिक कार्यकर्ते अमित राऊळ, ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शैलेश राणे, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र भिंगारे, वासुदेव राऊळ, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र तावडे, आनंद धोंड यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते बबन राऊळ, नामदेव राऊळ, अजित राऊळ, प्रदीप मोहिते आणि मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी वैद्यकीय पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर मुलतानी, नर्सिंग ऑफिसर सुमंगल बुगडे, रक्तपेढी समुपदेशक भूषण मळेकर, रक्तपेढी तंत्रज्ञ अक्षय सावंत, रक्तपेढी सहाय्यक तनुजा हरमलकर, परिचर सागर सावंत, सचिन बिले, तसेच वाहन चालक नितीन गावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शिबिरात कलंबिस्त, वेर्ले, सांगेली, सावरवाड, शिरशिंगे परिसरातील एकूण ३२ युवकांनी रक्तदान केले. दरम्यान गावचे पोलीस पाटील गणू राऊळ, सरपंच दीपक राऊळ यांनी उशिरा कार्यक्रम स्थळी भेट देऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्हानू उर्फ बबलू राऊळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुंदर राऊळ यांनी मानले.
