मालेगाव: नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे परिसरात चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपी विजय खैरनार याला मालेगाव अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी डोंगराळे परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार आणि तिच्या हत्येच्या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या खटल्यात शासन नियुक्त विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारची बाजू मांडली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याने पीडितेला न्याय मिळाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
१६ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपी विजय खैरनार याने चिमुकलीचा मृतदेह एका मोबाईल टॉवर जवळ टाकून दिला. चिमुकली घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी तपास सुरू केला. काही वेळानंतर मुलीचा मृतदेह सापडला. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात संतापाची लाट पसरली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास केला, आरोपी विजय खैरनार याला अटक केली. राज्य शासनाने या खटल्यात सरकारी पक्षाच्या बाजूने लढण्यासाठी ज्येष्ठ विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने २४ साक्षीदारांचे जबाब नोंदवून आरोपीविरोधातील पुरावे न्यायालयापुढे मांडले. या पुराव्यांच्या आधारे मालेगावच्या अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने १ ऑक्टोबर २०२६ रोजी विजय खैरनारला दोषी ठरवले होते. तर आज, १६ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली.
