कणकवली: येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार स्मिता माने यांचा मृतदेह बिडवाडी-हुंबरणे परिसरातील एका काजूच्या बागेत झाडाला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. १० ऑक्टोबर रोजी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले असून, स्मिता माने यांचे पती तथा कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने यांच्याविरोधात कौटुंबिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन दिवसांपासून होत्या बेपत्तामिळालेल्या माहितीनुसार, स्मिता माने या गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यांचे पती सचिन माने यांनीच त्या बेपत्ता असल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
दरम्यान, बिडवाडी-हुंबरणे येथील जंगलमय भागातील काजू बागेत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच स्मिता माने यांच्या माहेरच्या नातेवाइकांनी तातडीने कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पतीकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळूनच स्मिता यांनी आत्महत्या केली असावी अथवा या मृत्यूमागे काही घातपात असावा, असा गंभीर आरोप नातेवाइकांनी पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्याकडे केला.घरातील फरशीवर आढळले लांब केस; बहिणीचा मारहाणीचा संशयस्मिता यांची बहीण रेश्मा रवींद्र जाधव (रा. उंबरठ-पिंपळवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, स्मिता बेपत्ता असल्याची माहिती सचिन माने यांनीच रेश्मा यांना दिली होती. माहिती मिळताच रेश्मा या सचिन माने यांच्या घरी गेल्या असता, तेथील फरशीवर मोठ्या प्रमाणावर लांब केस उखडलेल्या अवस्थेत पडलेले दिसले. त्यामुळे स्मिता यांना तीव्र मारहाण झाली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला.तसेच, स्मिता यांचा मुलगा सार्थक याच्याकडे चौकशी केली असता, घटनेच्या रात्री सचिन माने यांनी स्मिता यांना पट्ट्याने मारहाण केली होती आणि त्यानंतर स्मिता या बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्या होत्या, अशी धक्कादायक माहिती मुलाने दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस तपासाला वेगसततचा शारीरिक व मानसिक छळ, मारहाण आणि त्रासाला कंटाळूनच स्मिता माने यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे किंवा त्यांच्या मृत्यूमागे घातपात असावा, अशी तक्रार बहिणीने दिल्यानंतर पोलिसांनी सचिन माने यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.महिला पोलिसाच्याच आत्महत्येमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, स्मिता माने यांच्या मृत्यूमागील नेमके सत्य काय आहे, याचा सखोल तपास कणकवली पोलीस करत आहेत.
