स्टोरी

ओटवणे गावचे सुपुत्र प्रकाश परब यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान!

Spread the love

ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे गावचे सुपुत्र तथा कांदिवली उत्तर नियंत्रण कक्षाच्या विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश महादेव परब यांच्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल त्यांना शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र लोकभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याहस्ते प्रकाश परब यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाला पोलिस दलात उल्लेखनीय, गुणवत्तापूर्वक कामगिरी आणि शौर्य बजावणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर केली जातात. राज्यपालांच्याहस्ते पदक प्राप्त झालेल्यांना त्यांचे नाव कोरलेली पदके आणि प्रशस्तिपत्रक प्रदान केले जाते. पोलिस उपनिरिक्षक प्रकाश परब यांच्या ३६ वर्षांच्या प्रामाणिक उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले होते.

पोलीस उपनिरीक्षक प्रकाश परब यांचे सर्व शिक्षण मुंबईतच झाले. त्यांच्या वडिलांनीही पोलिस खात्यात हवालदार म्हणून सेवा बजावली होती. त्यांचाच वारसा चालवत प्रकाश परब पोलीस खात्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. ओटवणे गावाच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात यांचा सहभाग असतो. मुंबईस्थित ओटवणे ग्रामस्थ मंडळाचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. प्रकाश परब महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुंबई विभागात १९८८ मध्ये दाखल झाले. यादरम्यान त्यांनी दादर येलोगेट, कुर्ला, बोरिवली, चुना भट्टी, गोरेगाव, कस्तुरबा मार्ग, एम एच बी कॉलनी, सशस्त्र विभाग नायगाव या पोलिस स्थानकामध्ये त्यांनी सेवा बजावली.

या शौर्य पदक, राष्ट्रपती पोलिस पदक, पोलिस पदक प्राप्त झालेल्यांमध्ये मिरा – भाईंदर व वसई-विरारचे पोलिस आयुक्त निकेत कौशिक, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके, मधुकर पांडे, विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीआयपी है सुरक्षा) प्रवीणकुमार पडवळ व विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके) निथीश मिश्र या अधिकाऱ्यांसह १०३ पोलिस अधिकारी व अंमलदारांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ पंकज भोयर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनीषा म्हैसकर, पोलिस महासंचालक सदानंद दाते, अतिरिक्त महासंचालक (एटीएस) नवल बजाज यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, आणि पदक प्राप्त मान्यवरांचे कुटुंबीय उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मूलभूत कलागुणांचा विकासच महत्वाचा..! कवी अजय कांडर यांचे कणकवली फ्लोरेट कॉलेज इंटिरियर अँड फॅशन डिझायनिंगच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात प्रतिपादन

news

एस्.टी. बस चालवतांना भ्रमणभाषवर बोलण्‍यास चालकांना प्रतिबंध !

news

छत्रपतीचं नाव घेऊन मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसू नका”; संभाजीराजेंना महाराष्ट्र एकीकरण समितीचं पत्र

news

Leave a Comment