सावंतवाडी प्रतिनिधी: तालुका क्रीडा विभाग व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने नेमळे हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयाने आपली विजयी घोडदौड कायम राखत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.या स्पर्धेत तालुकातील विविध शाळांनी भाग घेतला होता आरपीडी कळसुलकर कलंबिस्त थवडकी बांदा नेमळे आधी शाळा सहभागी झाल्या होत्या१७ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील अनेक नामांकित शाळांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक फेरीपासूनच कुणकेरीच्या संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
अंतिम सामना अटीतटीचा..! स्पर्धेचा अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला. एका बाजूला यजमान राणी पार्वती देवी हायस्कूल नेमळे तर दुसऱ्या बाजूला कुणकेरीचा बलाढ्य संघ असा सामना रंगला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट चपळाई आणि सांघिक कौशल्य दाखवले. मात्र, शेवटच्या सत्रात कुणकेरीच्या खेळाडूंनी आपल्या अनुभवी खेळाच्या जोरावर सामना फिरवला आणि दोन मिनिटे आणि चार गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
जिल्हास्तरावर सावंतवाडीचे नेतृत्व..! या विजयामुळे आचार्य विनोबा भावे विद्यालयाचा संघ येत्या १५ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेत हा संघ सावंतवाडी तालुक्याचे अधिकृतपणे नेतृत्व करणार आहे.*कुणकेरीची क्रीडा परंपरा कायम*कुणकेरी हायस्कूल म्हटले की खो-खो या खेळाचे माहेरघरच समजले जाते. ग्रामीण भागात असूनही या शाळेने क्रीडा क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांमध्ये असलेली शिस्त, जिद्द आणि सातत्यपूर्ण सराव हेच या यशाचे गमक आहे. यापूर्वीही या शाळेच्या संघाने जिल्हास्तर, विभागस्तर आणि राज्यस्तरापर्यंत मजल मारून सावंतवाडी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या दैदिप्यमान यशानंतर कुणकेरीसह संपूर्ण पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण पसरले आहे. या यशस्वी संघाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.यावेळी लोकसेवा संघाचे अध्यक्ष प्रसाद रेगे, सचिव उत्तम सराफदार , शाळेचे मुख्याध्यापक, अर्चना सावंत माजी मुख्याध्यापक भरत सराफदार विद्यार्थी पालक संघ, क्रीडा शिक्षक आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हास्तरावरही कुणकेरीचा संघ असाच पराक्रम गाजवून तालुक्याचे नाव उज्ज्वल करेल असा विश्वास ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.
