नवी मुंबई | जितिन शेट्टी : सीवूड्स जेटी, सेक्टर-३२ येथे युवा उद्योजिका सुनीता प्रजापती यांनी सुरू केलेल्या TYDE Cafe समोर सध्या कथित अडचणींचे संकट उभे राहिले आहे. दृष्टि कंपनीकडून आपल्यावर दबाव आणला जात असून, व्यवसायाला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप सुनीता प्रजापती यांनी केला आहे.सुनीता प्रजापती यांच्या आरोपानुसार, TYDE Cafe साठी आवश्यक असलेल्या पाणी, वीज आणि वॉशरूमसारख्या मूलभूत सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. या सुविधांअभावी कॅफेच्या दैनंदिन व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.एका युवा महिलेने स्वतःच्या मेहनतीवर उभा केलेला व्यवसाय कथित दबावामुळे अडचणीत येत असेल, तर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का? संबंधित प्रशासन आणि यंत्रणा या तक्रारीकडे गांभीर्याने पाहणार का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, तसेच संबंधित उद्योजिकेला आवश्यक ती सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या प्रकरणावर आता आणखी एक प्रश्न चर्चेत आहे—या युवा उद्योजिकेच्या कथित अडचणींविरोधात कोणता राजकीय पक्ष आवाज उठवणार?की TYDE Cafeच्या संचालिका सुनीता प्रजापती यांनाच ही लढाई एकट्याने लढावी लागणार?या आरोपांबाबत दृष्टि कंपनीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांची बाजू उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध केली जाणे आवश्यक आहे.
