
तालुका प्रतिनिधी )राहुल जयकर काळाडोह) : वाढदिवस म्हटला की केक, फुगे आणि अनावश्यक खर्च करण्याची प्रथा वाढत असताना, सांगवी बुद्रुक येथील सागर तायडे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श निर्माण केला आहे. सांची सागर तायडे हिच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधून काळाडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा, या सामाजिक भावनेतून सागर भीमराव तायडे, महसूल सेवक, सांगवी बुद्रुक यांनी हा स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम राबविला.या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे संच देण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. वाढदिवस साजरा करण्याची पारंपरिक पद्धत बाजूला ठेवून शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमातून समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण झाला आहे.“आपल्या आनंदाचा काही भाग गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला, तर त्या आनंदाला खऱ्या अर्थाने सामाजिक मूल्य प्राप्त होते,” असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने मौजमजेसोबतच समाजासाठी काहीतरी देण्याची ही सकारात्मक परंपरा इतरांनीही पुढे न्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
