सिंधुदुर्ग, दि. २६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत मतदार यादीशी संबंधित प्रक्रियेचे ९९.३६ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करून प्रक्रिया निर्धारित मुदतीत पूर्ण करावी. गैरहजर व कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या याद्यांची बूथस्तरीय अधिकारी (BLO) आणि बूथस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांच्यामार्फत पडताळणी करावी. कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी व अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासमवेत आयोजित SIR आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मतदार यादीच्या पुनरीक्षणाची प्रगती, डिजिटायझेशन, दावे व हरकती, नोटीस व सुनावणी प्रक्रिया तसेच नवमतदार नोंदणीचा आढावा घेतला. भारतीय नागरिकत्वाची अट पूर्ण करणाऱ्या आणि वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्याशी तत्पूर्वी चर्चा झाली. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी यांचे स्वागत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. यानंतर आढावा बैठकित जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील कामकाजाची माहिती दिली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी निवडणूक बालाजी शेवाळे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघांतील ३१ ऑगस्ट २०२६ रोजीच्या प्रारूप मतदार यादीत ६ लाख ५ हजार ५०१ मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी ५ लाख ६१ हजार ३१० मतदारांच्या नोंदी अंतिम प्रसिद्धीसाठी पात्र ठरविण्यात आल्या आहेत. दावे व हरकतींशी संबंधित ३ हजार ७५ मतदारांची प्रकरणे अद्याप प्रलंबित असून, त्यावर लवकरात लवकर कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिल्या. मतदारसंघनिहाय प्रगतीमध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघात ९९.९८ टक्के, कुडाळमध्ये ९८.७२ टक्के आणि सावंतवाडीमध्ये ९९.३३ टक्के काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील नोटीस व सुनावणी प्रक्रियेतील एकूण प्रगती ९९.३६ टक्के असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील ६ लाख ८८ हजार १४ विद्यमान मतदारांच्या तुलनेत प्रारूप मतदार यादीत ६ लाख ५ हजार ५०१ मतदारांचा समावेश आहे. गणना अर्जांपैकी ८२ हजार ५१७ अर्ज विविध कारणांमुळे संकलित करता आलेले नाहीत. यामध्ये ३६ हजार ६०१ मृत मतदार, ४ हजार ३६५ अनुपस्थित अथवा शोधता न आलेले मतदार, ३३ हजार ७६६ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार आणि ७ हजार ६६७ अन्यत्र आधीच नोंदणी झालेल्या मतदारांचा समावेश आहे. या याद्यांची BLO आणि BLA यांच्या माध्यमातून सखोल आणि प्रत्यक्ष पडताळणी करण्यावर त्यांनी भर दिला.
मतदार यादीतील नोंदींची खातरजमा करताना विशेषतः फॉर्म ७ अंतर्गत नाव वगळण्याच्या प्रकरणांमध्ये आवश्यक ती प्रत्यक्ष पडताळणी करावी. पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. मतदार नोंदणी, नाव वगळणे आणि मतदार यादीतील तपशील दुरुस्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नमुना ६, ७ व ८ च्या अर्जांबाबतही बैठकीत चर्चा झाली. या तीन प्रकारच्या अर्जांचे एकूण १० हजार २९२ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ८ हजार ५५३ अर्जांवरील कार्यवाही सुरू आहे. अर्ज भरण्यास काही नागरिक अनुत्सुक असतील किंवा त्यांना प्रक्रियेबाबत अडचणी येत असतील, तर BLO आणि BLA यांनी त्यांना आवश्यक सहकार्य करावे. येणाऱ्या नियमित मतदार नोंदणी प्रक्रियेलाही गती द्यावी. या प्रक्रियेत राहून गेलेल्या पात्र नागरिकांना नोंदणीची संधी उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी राजकीय पदाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेत SIR प्रक्रियेत पारदर्शकता राखून कोणती नावे वगळण्यात आली, कोणत्या नोंदींमध्ये सुधारणा करण्यात आली आणि संबंधित अर्जांवर काय कार्यवाही झाली, याची माहिती सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध असणे आवश्यक असल्याची भूमिका मांडण्यात आली. या अनुषंगाने प्रक्रियेची माहिती सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोबर रोजी संपली असून, नोटीस व सुनावणी प्रक्रियेची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करून पात्र मतदारांच्या नोंदी अचूक व अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.नवीन ईव्हीएम गोडाऊनची पाहणी दरम्यान, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सिंधुदुर्गनगरी येथील नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) गोडाऊनची प्रत्यक्ष पाहणी केली. मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅटच्या सुरक्षित साठवणुकीसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. गोडाऊनमधील सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन यंत्रणा, द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था तसेच आवश्यक भौतिक व तांत्रिक सुविधांची तपासणी करण्यात आली. नवीन गोडाऊनची उभारणी व व्यवस्थापन करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हा प्रशासन व अधिकाऱ्यांना दिले. मतदार यादीचे पुनरीक्षण आणि मतदान यंत्रांची सुरक्षितता या दोन्ही बाबींमध्ये नियमबद्धता, पारदर्शकता आणि अचूकतेला प्राधान्य देण्यावर त्यांनी भर दिला.
