स्टोरी

स्मार्ट कार्ड’वर मराठीचा विसर? सवलतीच्या प्रवाशांना मराठीतील ओळखपत्र देण्याची मागणी.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील महिलांना तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येत असून, ७५ वर्षांवरील नागरिकांना राज्यभर विनामूल्य प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. या सवलतीच्या प्रवासात अधिक सुसूत्रता यावी आणि लाभार्थ्यांची ओळख निश्चित करता यावी, यासाठी महामंडळाने बसस्थानक स्तरावर सवलतीच्या प्रवाशांना ‘स्मार्ट कार्ड’ स्वरूपातील ओळखपत्र देण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, या ओळखपत्रावरील माहिती इंग्रजी भाषेत असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला मराठी भाषेचे वावडे आहे का?’ असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.महामंडळाच्या या स्मार्ट कार्ड ओळखपत्राची पडताळणी केली असता त्यावरील परिभाषा आणि माहिती इंग्रजी भाषेत असल्याचे दिसून येते. याविषयी कार्ड वितरण करणाऱ्या संबंधित व्यक्तीकडे विचारणा करण्यात आली असता, या संदर्भात माहिती देण्यास असमर्थता दर्शविण्यात आली, अशी नागरिकांची तक्रार आहे.### महाराष्ट्रात मराठीसाठी सक्ती; मग महामंडळात इंग्रजीच का?महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, ओला आणि उबेर चालकांना परवाना देताना मराठी भाषा बोलता येणे अनिवार्य करण्यात आले आहे. मराठी भाषा येत नसल्यास ती शिकवण्यासाठी शासनाच्या वतीने प्रशिक्षण वर्गही आयोजित केले जात आहेत. संबंधित चालकांना मराठी बोलता येते की नाही, याची परीक्षा घेण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध स्तरांवर मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सामान्य प्रशासन विभागाने शासनाच्या विविध विभागांना प्रशासकीय कारभार मराठी भाषेत करण्याचे आदेश दिले आहेत. मराठी भाषा दिनापासून राज्य स्थापनेशी संबंधित विविध कार्यक्रमांपर्यंत मराठीचा गौरव केला जातो.राज्यात दुकानांच्या फलकांवर मराठी भाषेचा वापर करण्यासाठीही कारवाई केली जाते. काही ठिकाणी मराठी न बोलणाऱ्या व्यक्तींनी मराठी बोलावे, यासाठीही आग्रह धरला जातो. विधिमंडळाचे कामकाज मराठी भाषेत चालते. अशा वेळी राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवासी सेवा पुरविणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने लाभार्थ्यांना देण्यात येणारे महत्त्वाचे ओळखपत्र मराठी भाषेत का उपलब्ध करून देऊ नये, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

बहुजनहिताय, बहुजनसुखाय’च्या ब्रीदाला साजेसा निर्णय अपेक्षित ! बहुजनहिताय, बहुजनसुखाय’ हे ब्रीदवाक्य जोपासणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्यातील सर्वसामान्य, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचे प्रमुख माध्यम आहे. त्यामुळे महामंडळाने दिलेले स्मार्ट कार्ड ओळखपत्र लाभार्थ्यांना सहज समजेल, अशा मराठी भाषेत असणे अपेक्षित आहे.विशेषतः ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना इंग्रजी भाषा वाचता येत नाही. त्यामुळे ओळखपत्रावरील सूचना, माहिती आणि तपशील मराठीत उपलब्ध झाल्यास त्यांची गैरसोय टळू शकते.

इंग्रजीसोबत मराठी भाषेचाही वापर करून द्विभाषिक ओळखपत्र देण्याचा निर्णय महामंडळाने घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.मराठी भाषेला राज्यात विविध क्षेत्रांत प्राधान्य देण्याची धोरणे असताना राज्य परिवहन महामंडळाच्या स्मार्ट कार्ड ओळखपत्रावर मात्र मराठीचा अभाव का आहे? महामंडळाला खरोखरच मराठी भाषेचे वावडे आहे का? की हा केवळ प्रशासकीय दुर्लक्षाचा प्रकार आहे, याचे स्पष्ट उत्तर संबंधित प्रशासनाने द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.महामंडळाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी स्मार्ट कार्ड ओळखपत्रे मराठी अथवा किमान मराठी-इंग्रजी या द्विभाषिक स्वरूपात उपलब्ध करून द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Spread the love

Related posts

अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीस चालना मिळावी..! डॉ.सुभाष घुले

news

झारापमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन व पाककला स्पर्धा संपन्न.

news

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत दिव्यांग मुलांना साहित्यांचे वाटप!

news

Leave a Comment