सावंतवाडी -प्रतिनिधी: महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं, ‘चला शहराकडून गावाकडे’. शहरात औद्योगिक क्रांती होत असली तरी माणुसकीचा झरा हा खरा ग्रामीण भागातच आहे. विकास म्हणजे काय, हे शहरात सापडणार नाही, त्यासाठी गावातच यावं लागतं. गावपण जपणारी माणसं अजूनही गावात आहेत म्हणूनच ‘गाव करील ते राव काय करील’ हे वेर्ले गावाने सिद्ध करून दाखवले आहे.जे शासनाला, प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जमलं नाही, ते गावच्या एकजुटीने करून दाखवता येतं, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, शेतीप्रधान आणि निसर्गरम्य वेर्ले गाव. या गावात आजही गावपण, एकजूट आणि एकोपा पाहायला मिळतो.शासनाच्या योजनांच्या लाभाची वाट न पाहता, आपण एकजुटीने खूप काही करू शकतो, हे या गावाने दाखवून दिले आहे.
वेर्ले येथील फौजदारवाडी आणि लिंगवतवाडी येथील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.आमदार निधी, खासदार निधी किंवा जिल्हा नियोजनचा निधी न वापरता, ‘आपल्यासाठी आपणच काहीतरी करायचं’ या भावनेतून सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांसाठी सुसज्ज बस स्टॉपची उभारणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पहिला स्वखर्च आणि श्रमदानातून उभारलेला बस स्टॉप असून त्याचा लोकार्पण सोहळा विजयादशमी, दसऱ्याच्या दिवशी, दि. २० ऑक्टोबर रोजी* होत आहे. स्वतःची मोक्याची जागा दान दिली. आपल्या वाडीतील महिला, शाळकरी मुले ऊन-पावसात झाडाखाली उभे राहून तासंतास एसटीची वाट पाहतात, हे पाहून गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि नेहमीच गावच्या आरोग्य, शिक्षणासाठी झटणारे डॉ. संजीव लिंगवत, त्यांचे बंधू सतीश लिंगवत आणि विश्राम बाबू लिंगवत या तिघांनी पुढाकार घेतला.त्यांनी रस्त्यालगतची स्वतःची अत्यंत मोक्याची जागा कै. लक्ष्मण सोमालिंग व त आणि कै. काशीबाई पुंडलिक लिंगवत यांच्या स्मरणार्थबस थांबा उभारण्यासाठी दान दिली.जागा मिळाल्यावर बस स्टॉप उभारणीची यादी तयार झाली आणि गावातील तरुणांनी पुढाकार घेतला. अवघ्या १५ ते २० दिवसात अद्ययावत आणि सर्व सुविधायुक्त बस स्टॉप उभा राहिला.प्रत्येकाने आपल्या परीने मदत केली. सुमारे १०१ जणांनी कोणी ५००, कोणी १००० रुपये, तर काहींनी पाच पोती सिमेंट अशी मदत देत महिन्याभराच्या आत हा बस स्टॉप पूर्ण केला.
१५ सप्टेंबरला भूमिपूजन, २० ऑक्टोबरला लोकार्पण..! या उपक्रमाला सरपंच रुचिता राऊळ, ग्रामपंचायत सदस्य बाळू गावडे यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. यशवंत घाडी, सुधीर राऊळ, नामदेव राऊत, समीर सावंत, सुधीर लिंगवत, देव बाडेकर मित्र मंडळ अशा जवळपास १०० जणांनी आपल्या परीने मदतीचा हात दिला.या बस स्टॉपचे भूमिपूजन दि. १५ सप्टेंबर रोजी झाले आणि अवघ्या महिन्याभरात तो पूर्ण झाला. विशेष म्हणजे या लोकार्पण सोहळ्यासाठी कोणत्याही राजकीय नेते, मंत्री किंवा पुढाऱ्याला न बोलावता, ज्या सर्वसामान्य जनतेने मदतीचा हात दिला, त्यांच्याच साक्षीने हा कार्यक्रम करण्याचे नियोजन तरुणांनी केले आहे.लोकप्रतिनिधींवर अवलंबून न राहता आपणच आपल्या गावचा विकास करणार, आमच्या गावच्या शाळा, आरोग्य, बस स्टॉप, ग्रामपंचायत, रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गरजा आम्हीच सोडवणार, ही जिद्द या गावाने दाखवली आहे. यापूर्वीही या गावाने अशाच एकजुटीतून घरापर्यंत जाणारा रस्ता स्वतःच तयार केला होता.या उपक्रमाचे सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनीही कौतुक केले असून ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. स्वावलंबनाचा हा नवा पायंडा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
