सावंतवाडी: सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) क्षेत्रातील अनुभवी आणि तंत्रकुशल अधिकाऱ्यांचा अभाव असल्याने, सध्या समोर येत असलेल्या प्रशासकीय व आर्थिक अनियमिततेची चौकशी सरकारी किंवा निमसरकारी सेवेतील अनुभवी अधिकाऱ्यांमार्फतच केली जावी, अशी जोरदार मागणी सावंतवाडीच्या नागरिकांमधून केली जात आहे.**मागील चौकशांचा ‘फार्स’ अन् कर्मचाऱ्यांची निर्दोष मुक्तता**नगरपरिषदेच्या विविध विभागांमधील जुना कारभार पाहता, अंतर्गत चौकशा केवळ देखावा ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यापूर्वी बांधकाम, आरोग्य, कर व जकात विभागातील कर्मचाऱ्यांवर कामात आणि आर्थिक बाबींत गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप झाले होते. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले;
मात्र “मिले सुर मेरा तुम्हारा…”* या उक्तीप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांचे सूर जुळल्याने कोणावरही कारवाई झाली नाही आणि दोषी कर्मचारी आज शांततेत निवृत्तीवेतन (Pension) भोगत आहेत.नागरिकांनी मागील काही प्रकरणांची उदाहरणे देऊन प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे:
बांधकाम विभाग: रहिवासी दाखले व बांधकामाच्या पडताळणीत अनियमितता झाल्याच्या आरोपांवरून तीन वेगवेगळ्या स्तरांवर चौकशी झाली. मात्र चौकशी करणारे अधिकारी पालिकेचेच कर्मचारी असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना निर्दोष सोडण्यात आले..
आरोग्य विभाग: उपरळकर स्मशानभूमीत निकृष्ट दर्जाची लाकडे पुरवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. पुराव्यादाखल स्मशानातील लाकडे थेट नगरपरिषदेच्या व्यासपीठावर आणून जंगी सभा झाली. एवढे पुरावे असूनही चौकशीअंती कर्मचारी निष्पाप ठरले.
जकात विभाग: जकात वसुलीतील आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहाराबाबत अनेक नाका-लिपीकांची चौकशी लावली गेली; परंतु तिथेही कोणावरच ठपका ठेवला गेला नाही.
कर विभाग: सावंतवाडीतील एका नामवंत घराण्याच्या वाड्याची घरपट्टी गोळा करताना लिपीकाने दुहेरी पावती देऊन अपहार केला होता. तक्रारीनंतर अपहाराची रक्कम वेतनातून कपात करण्याचा निर्णय झाला. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याचे निधन झाल्यावर पालिकेने त्याच्या पाल्याला अनुकंपा तत्त्वावर कामावर घेऊन त्याच्या वेतनातून उर्वरित रक्कमेची वसुली केली.
पाणीपुरवठा विभागात ‘मीटर गायब’ प्रकरण..! सन २००० मध्ये पाणीपुरवठा विभाग शासनाकडून नगरपरिषदेकडे हस्तांतरित झाला. सध्याच्या प्रशासकीय राजवटीत पाण्याचे मीटर्स कार्यालयातील कपाटात सुरक्षित ठेवलेले असताना आणि सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवलेले असतानाही अनेक मीटर गायब होत आहेत. या प्रकारावर पालिकेत “आळीमिळी गुपचिळी” साधली जात असून आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता वर्तवली जात आहे.
“उंदराला मांजर साक्ष” नको…! सावंतवाडीच्या नगराध्यक्षा माननीय श्रद्धा राजे सावंत-भोसले यांनी मुख्याधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अंतर्गत चौकशी झाल्यास “उंदराला मांजर साक्ष” ठरून पुन्हा एकदा सर्व दोषी निर्दोष सुटतील, अशी भीती व्यक्त होत आहे. सध्या कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांची प्रतिमा जनसामान्य व लोकप्रतिनिधींमध्ये मलीन झालेली असून, त्यांच्या बदलीसाठी यापूर्वी लोकप्रतिनिधीनी चे उपोषणही झाले होते. अशा अधिकाऱ्यांकडून चौकशी झाल्यास सत्य बाहेर येणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.त्यामुळे पाणीपुरवठा विभागातील तांत्रिक व आर्थिक व्यवहारांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी प्रशासनाबाहेरील, स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्राचा अनुभव असलेल्या सक्षम शासकीय अधिकाऱ्याची (Government Engineer) नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी सावंतवाडीतील नागरिकांमधून केली जात आहे.
