ओरस ( दीपक पटेकर): आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस प्रशालेच्या *माजी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन बुधवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता प्रशालेच्या अर्जुन सावंत सभागृहात करण्यात आले आहे. आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळाच्या माध्यमातून सन १९७९ मध्ये या शाळेची स्थापना करण्यात आली. शाळेच्या स्थापनेपूर्वी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी दूरच्या गावांमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते. त्या काळात पंचक्रोशीतील काही जागरूक नागरिकांनी पुढाकार घेत शाळा सुरू करण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यामुळे आरोस, साटेली, तळवणे, मळेवाड, दांडेली आणि सातार्डा या गावांतील विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातच माध्यमिक शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. तसेच या पंचक्रोशी बाहेरील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम या प्रशालेने केले आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळाने शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी सातत्याने योगदान दिले आहे. या शाळेच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून, अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.
शाळेच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचाही सक्रिय सहभाग असावा आणि शाळेशी असलेले माजी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध अधिक दृढ व्हावेत, या उद्देशाने *संस्थेच्या मदतीने, शिक्षकांच्या मार्गदर्शनातून व माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने सन २०२५ मध्ये आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघाची स्थापना* करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांना एका व्यासपीठावर आणणे, शाळेमध्ये उत्तम शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी योगदान देणे, ज्ञानवर्धक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, तसेच *ज्या संस्थेमुळे ही शाळा उभी राहिली आणि ज्या शिक्षकांनी आपल्या ज्ञान व संस्कारातून हजारो विद्यार्थी घडविले, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे*, हा या माजी विद्यार्थी संघाचा प्रमुख उद्देश आहे आणि याच भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच शाळेच्या भविष्यातील विकासासाठी विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात येणार आहे.
तसेच आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघाची सदस्य नोंदणी देखील करण्यात येणार आहे. “ज्या शाळेने आम्हाला शिक्षण, संस्कार आणि जीवनाची दिशा दिली, त्या शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकत्र येणे व आपले योगदान देणे हीच आमची कृतज्ञता आहे,” अशी भावना माजी विद्यार्थी संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या स्नेह मेळाव्यास प्रशालेच्या सर्व माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित राहाव, असे आवाहन आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल माजी विद्यार्थी संघ, आरोस यांच्या वतीने करण्यात आले आहे.
